मुंबई - मोडकसागर तलावाची खोली वाढविण्यासाठी महापालिका बुधवारी तलावात लेक टॅपिंग करणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वापरण्यास अयोग्य ( मृत साठा ) असलेले पाणी पालिकेला वापरता येणार आहे. त्यामुळे पाऊस महिनाभर लांबला तरी मुंबईकरांवर पाण्याचे संकट ओढवणार नाही. लेक टॅपिंग करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका आहे.
मोडकसागर तलावाजवळील टेकडीवर महापालिकेने तीन बोगदे बांधले आहेत. त्यातील दोन बोगदे तलावाशी आणि मुंबईला पाणीपुरवठा करणार्या जलबोगद्याशी जोडले आहेत. मात्र १३६ मीटर्सचा जलबोगदा तलावाशी जोडायचा आहे. तलावात तीन मीटरचा खडक असल्याने हा खडक स्फोटाने फोडण्यात येणार आहे. या स्फोटामुळे दगड फुटून हा तिसरा जलबोगदा धरणाशी जोडला जाईल आणि तलावातील मृत साठाही वापरता येणार आहे. या लेक टॅपिंगसाठी ९ कोटी रुपये खर्च होणार आहे. बुधवारी दुपारी १२.३० वाजता हा प्रयोग होईल. कोयना धरणात लेक टॅपिंग करणार्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात हे लेक टॅपिंग होणार असल्याचे पालिकेने कळविले आहे.