मुंबई मधील कचरा स्वछ करणाऱ्या पालिकेतील सफाई कर्मचार्यांना आपल्या हक्काच्या घरात वास्तव्यासाठी जागा मिळत नसल्याचे भीषण चित्र चेंबूरमध्ये पाहायला मिळत आहे. पालिकेच्या मालकीची घरे असताना काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने या घरांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांची हक्काची घरे राजकीय पुढारी आपल्या राजकीय कार्यकर्ते असलेल्या गुंडांकडून लाटत असल्याने पालिका कारामाचार्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
१९६२ साली महापालिकेने साफसफाई कामगारांसाठी चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्गावर एकूण १६ इमारती बांधल्या. त्यानंतर १९७७ साली आणखी ४ नवीन इमारतींची त्यात भर पडली. या इमारतींमध्ये सध्या ४00 पालिका कर्मचारी कुटुंबीयांसह राहत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पालिकेकडून या इमारतींची डागडुजी न झाल्याने यातील काही इमारतींची सध्या अत्यंत दयनीय अवस्था आहे. पावसाळ्यात इमारतींमधील छतावरील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सतत छतातून पाणी गळत राहते. इमारतीच्या बाजूने घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे उंदीर, घुशींनी इमारतीचा पाया पोखरून टाकला आहे. भिंतींना आणि बाल्कनींना मोठमोठे तडे गेल्याने त्यामधून स्लॅब कोसळण्याच्या घटना रोजच घडतात.
याबाबत येथील कर्मचार्यांनी अनेकदा पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटून आणि पत्रव्यवहार करून व्यथा मांडल्या. मात्र, पालिकेने याकडे नेहमीच काणाडोळा केला. वर्षभरापूर्वीच येथील इमारत क्रमांक ३ मधील छताचा स्लॅब मोठय़ा प्रमाणात कोसळू लागल्याने येथील रहिवाशांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पालिका अधिकार्यांनी याची पाहणी करून इमारतीला धोकादायक घोषित केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पालिकेने या इमारतीच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव आखला. यासाठी येथील रहिवाशांना इमारत तयार होईपर्यंत चेंबूरमधील घाटला गाव येथे असलेल्या महादेव पाटीलवाडी येथील पालिकेच्या घरांमध्ये पाठवण्याचे ठरवले. एसआरए अंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये पालिकेच्या मालकीची २३ राखीव घरे आहेत.
पालिका अधिकार्यांनी ३ नंबर इमारतीमध्ये राहणार्या १२ कुटुंबीयांना पहिल्यांदा त्या ठिकाणी हलवण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांना घरांच्या चाव्याही देण्यात आल्या. मात्र, आठ दिवसांपूर्वी पालिका कर्मचारी आणि अधिकारी या घरांचा ताबा घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता, एका वरिष्ठ राजकीय नेत्याने आणि काही लोकांनी या घरांचा ताबा या कर्मचार्यांना देण्यास विरोध दर्शवला. पालिका अधिकारीदेखील या नेत्यापुढे तोंड उघडू शकत नव्हते. त्यामुळे काहीही न बोलता हे अधिकारी कर्मचार्यांना घेऊन कार्यालयात परतले. पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या राहत असलेली इमारत कोसळण्याची भीती या कर्मचार्यांना आहे. त्यामुळे लवकरच आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पाटीलवाडीमधील घरे पालिकेच्या मालकीची असताना या नेत्यांकडून हा विरोध का होत आहे, याच्या चौकशीची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
गेल्या ५0 वर्षांपासून पालिकेचे हे कर्मचारी लोखंडे मार्गावरील या पलिका वसाहतीमध्ये राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांची शाळा, कॉलेज याच परिसरात आहे. पालिकेने पाटील वाडीत जागा उपलब्ध करून दिल्यास सर्वांनाच सोयीस्कर होणार आहे. मात्र, या घरांवर राजकीय नेत्यांच्या आशीवार्दाने काही भूमाफियांनी कब्जा केला आहे. याबाबत मालमत्ता विभाग अधिक चौकशी करत आहे. चौकशीनंतर त्यांच्याकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- संध्या नांदेडकर, साहाय्यक आयुक्त, एम पश्चिम विभाग