५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. मात्र, यंदाचा शिक्षक दिन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी काहीसा वेगळा ठरणार आहे. कारण, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तसा फतवाच काढलाय. शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. हे भाषण देशातल्या सर्व शाळांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना पाहणे आणि ऐकणे सक्तीचे करण्यात आले आहे.
ज्या शाळांमध्ये टीव्ही नसतील त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात टीव्हीची व्यवस्था करुन भाषण पाहण्याची सक्ती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे. लाईट नसेल तर जनरेटर लावा, असे स्पष्ट लेखी आदेश देण्यात आले आहेत. दुर्गम भागात टीव्ही दाखवणे शक्यच नसेल तर रेडिओवर भाषण ऐकण्याची सोय करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
इतकचं नव्हे तर, किती विद्यार्थ्यांनी भाषण ऐकले त्याचा अहवालही पाठवणे बंधनकारक कऱण्यात आले आहे. त्यासंदर्भातले आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून शाळांना पाठवण्यात आले आहेत. व्हीडिओ कॉफरन्सद्वारेही कार्यक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केला आहे. मोदी सरकारचा खरा चेहरा पुढे आल्याचे काँग्रेसने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.