आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सध्या चांगले वातावरण आहे. त्यामुळे जागावाटपावरून जास्त खेचाखेची करू नका, असे आवाहन करीत प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, असा सूचक सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे.
शिवसेनेच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चा तिसरा टप्पा ठाकरे यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत सादर केला. त्यावेळी शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या कलगीतुऱयावर त्यांनी आपली भूमिका मांडली. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना-भाजपाची अभेद्य युती आहे. युती तुटावी असे कोणतेही वक्तव्य आपण केले नाही. त्यादृष्टीने कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपाची 135 जागांची मागणी अमान्य असल्याचे सांगत जागावाटपासंदर्भात दोन्ही पक्षांकडून चर्चा सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत यावर तोडगा निघेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. उमेदवारीसंदर्भात सध्या कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांच्याविषयी बोलण्यास ठाकरे यांनी नकार दिला.