निवडणूक प्रशिक्षणाचा परीक्षांवर परिणाम होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 September 2014

निवडणूक प्रशिक्षणाचा परीक्षांवर परिणाम होणार

मुंबई : पुढील महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाचा शाळा-महाविद्यालयांतील परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. निवडणूक तारखेची घोषणा झाल्यानंतर आपले वेळापत्रक बदलणार्‍या शाळा-महाविद्यालयांना आता शिक्षकांना दिल्या जाणार्‍या निवडणूक विषयक प्रशिक्षणाच्या तारखांनुसार परीक्षांच्या वेळापत्रकात सुधारणा करावी लागणार आहे. 

अनेक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाच्या निमित्ताने दोन दिवस, तर 'अपॉईण्टमेंट ऑर्डर' स्वीकारण्यासाठी एक दिवस निवडणूक विभागाकडे हजेरी लावावी लागणार आहे. निवडणूक प्रशिक्षण सत्राच्या या तारखा सत्र परीक्षांदरम्यान असल्याने शाळा-महाविद्यालयांना परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक शाळांमधून किती शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे, यावर सत्र परीक्षांच्या वेळापत्रकातील बदल विसंबून असल्याचे अंधेरीच्या हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलमधील शिक्षक उदय नरे यांनी सांगितले. त्यांना २४ सप्टेंबर, ७ आणि ८ ऑक्टोबर या तीन दिवशी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. 

या प्रशिक्षण सत्रामुळे महाविद्यालयांना अंतर्गत परीक्षांच्या तारखा बदलाव्या लागत आहेत. आम्ही निवडणूक प्रशिक्षणात सहभागी न होणार्‍या कर्मचार्‍यांना बरोबर घेऊन या परीक्षा पार पाडण्याची योजना आखत आहोत. जर तसे शक्य झाले नाही तर परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय उरणार नसल्याचे चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती ठाकूर यांनी सांगितले. निवडणूक कार्यक्रमामुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा लागत असल्याने शिक्षकांबरोबरच विद्यार्थी व पालकवर्गात नाराजीचा सूर उमटला आहे.

Post Bottom Ad