अमित शाह उद्या मुंबईत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2014

अमित शाह उद्या मुंबईत

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून या तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह उद्या शनिवारी मुंबईत येत आहेत. अमित शाह स्वतः या निवडणुकीत संघटनात्मक डावपेच निश्चित करणार असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराची बाजू सांभाळणार आहेत. 20 दिवसांच्या प्रचार काळात ते जवळजवळ 24 जाहीर सभा घेणार आहेत. 

भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रूडी तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात महायुती ही निवडणूक लढणार होती. त्यामुळे मोदी यांनी राज्यात चार दिवसांत 12 सभा घेण्याचे ठरविले होते. आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्या लागत असल्यामुळे या सभांची संख्या 24 पर्यंत जाऊ शकते, असे ते म्हणाले. विजयादशमीनंतर या सभा होतील. राज्यात प्रमुख ठिकाणी या सभा घेतल्या जातील. उरलेल्या ठिकाणी इतर नेते प्रचार करतील. अमित शाह आपल्या उद्याच्या दौऱ्यात प्रदेश भाजपाच्या तयारीचा विस्तारपूर्वक आढावा घेणार आहेत. दादरच्या वसंतस्मृती या कार्यालयात दिवसभर ही आढावा बैठक चालणार असल्याची माहिती रूडी यांनी यावेळी दिली.
भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी छुपे संबध असल्याचे आरोप केले जात आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे झाले असले तरी, त्यांची आपसातली पापे कमी होत नाहीत. भ्रष्टाचारमुक्त भारत हा एकमेव अजेंडा भारतीय जनता पार्टीचा असून छुप्या संबंधाबाबतच्या चर्चा निव्वळ काल्पनिकच नव्हे तर तथ्यहीन आहे, असेही ते म्हणाले. गेल्या 15 वर्षांत महाराष्ट्रातील जनता या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला विटली  आहे. त्यापासून महाराष्ट्राला मुक्ती देण्यासाठी भाजपाने दंड सरसावले आहेत. तब्बल दोन दशकानंतर पुन्हा एकदा जनतेला आपली ताकद दाखविण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला विश्‍वास आहे की, महाराष्ट्रातील अभ्यासू आणि समजूतदार जनता बहुरंगी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीलाच कौल देईल. जनतेच्या याच ताकदीवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सशक्त आणि विकसनशील सरकार देईल, असेही रूडी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात गुरूवारी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. याबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना रुडी म्हणाले की, आक्रोश, उद्रेकाचे वेगवेगळे स्वरुप असतात. राजकारणात आपापल्या भावना प्रकट केल्या जात असतात. मात्र, कोणत्याही प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांचे सत्र आमच्यात चालावे असे आम्हाला वाटत नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीने असा कोणताही आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केला जाणार नाही. अमर्यादीत शब्दप्रयोगदेखील केले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad