पालिकेच्या तांत्रिक अहवालात धक्कादायक माहिती
मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचार्यांसाठी असलेली डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडईची इमारत १९९५ पासूनच पोखरण्यास सुरुवात झाली होती. निवासस्थानांच्या जागेत गोदाम बांधण्यासाठी महापालिकेच्या बाजार विभागाने पहिल्यांदा या इमारतीच्या भिंतीवर बेकायदा हातोडा चालवला, अशी धक्कादायक माहिती पालिकेच्या तांत्रिक अहवालात देण्यात आली आहे. प्रशासकीय अहवालात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंदाधुंदी कारभारावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेचे बडे अधिकारी या प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडई इमारतीत भाडेकरू असलेल्या मामामिया डेकोरेटर्सने पिलर तोडल्यामुळे ही इमारत कोसळली, असे प्राथमिक अहवालात म्हटले होते; मात्र तांत्रिक समितीच्या अंतिम अहवालात १९९५ पासूनच या इमारतीच्या अंतर्गत रचनेत बदल करण्यास सुरुवात झाली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निवासी गाळ्यांत गोदाम थाटण्यासाठी प्रथम भिंती पाडण्यात आल्या. कॉंक्रीटचा ओटा पाडल्यामुळे भिंती अधिकच कमकुवत झाल्या, असे या तांत्रिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. बाजार विभागाने कोणताही तांत्रिक सल्ला न घेता या भिंती पाडल्या असल्याने इमारत कमकुवत झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल तयार झाला असून, लवकरच आयुक्तांना सादर करण्यात येईल; मात्र हा अहवाल गोपनीय असल्याने त्याबद्दल माहिती देता येणार नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी सांगितले आहे.
दरम्यान प्रशासकीय अहवालही तयार झाला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंदाधुंदीपणामुळे ही इमारत पडली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याबाबत महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले असल्याचे समजते. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, बाजार विभागाचे सहायक आयुक्त चंद्रशेखर चोरे हे अधिकारी तेव्हा बाजार विभागाशी संबंधित होते. इमारत कोसळल्यानंतर त्यांच्यावर आरोपही झाले होते.