मुंबईची बत्तीगुल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2014

मुंबईची बत्तीगुल

टाटा पॉवर कंपनीचा ट्रॉम्बे येथील ५०० मेगावॉटची वीजनिर्मिती करणारा एक संच मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या दरम्यान बंद पडला. त्यामुळे दक्षिण मुंबई तसेच पूर्व व पश्चिम उपनगरातही अंधार पसरला. अनेक कार्यालये, हॉस्पिटले, बँका, हॉटेलांना त्याचा मोठा फटका बसून संपूर्ण कामकाजच बंद पडले. टाटा पॉवरच्या संच क्रमांक ५ मध्ये ट्रिपिंग झाल्यानंतर पारेषण यंत्रणेवर ओव्हरलोड आल्याने अर्ध्या मुंबईत  अंधार पसरला. देशाच्या या आर्थिक राजधानीचे केवळ काही तासांत मोठे व्यावसायिक नुकसान झाले. 


घरगुती ग्राहकांप्रमाणेच व्यावसायिक संकुले, मोठी कॉर्पोरेट बिझनेस हाऊस ठप्प झाली. 500 मेगावॉटच्या संचातून होणारी वीजनिर्मिती थांबल्याने मुंबईतील 40 टक्के भागात भारनियमन करण्यावाचून पर्याय उरला नाही. गौराईच्या आगमनाच्या वेळातच मुंबईवर हे विघ्न ओढवले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांत दिवसाही काळोख पसरला. कार्यकर्ते हताश झाले.
याआधीच्या 21 नोव्हेंबर 2010 रोजीच्या पारेषण वाहिनीतील बिघाडानंतर पहिल्यांदाच इतका वेळ मुंबईत चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागले. सकाळी 9.45 च्या सुमारास टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील संच क्रमांक पाचने आधीच अडचणीत असलेल्या टाटा पॉवरसोबत असहकार्य पुकारले. युनिट आठ आणि सहा आधीच बंद असल्याने टाटा पॉवरच्या वीजनिर्मितीचे तीनतेरा वाजले. जलविद्युत प्रकल्पावरच टाटाची दारोमदार होती. एकट्या बेस्ट उपक्रमाच्या क्षेत्रातच हुतात्मा चौक, नरिमन पॉईंट, मेट्रो चित्रपटगृह, शिवडी, दादर, परळ, महालक्ष्मी, धारावी, चेंबूर, ग्रॅण्ट रोड आदी ठिकाणी 300 मेगावॉटचे भारनियमन सुरू होते. अनेक भागांत टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठीचे आणि बेस्ट व रिलायन्सचेही फीडर बंद करावे लागले. रिलायन्सच्या चेंबूर, सांताक्रूझ, विक्रोळी, साकीनाका आणि जुहू परिसरातही अर्ध्या तासाचे चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले.
अनेक कॉर्पोरेट हाऊस तसेच गगनचुंबी इमारतींतील लिफ्ट बंद पडल्याने त्यात काही जण अडकले होते. त्यानंतर जनरेटर सुरू करून व पॉवर बॅकअपवरून त्यांची सुटका करण्यात आली. बेस्टने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, दुपारी अडीचच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात टाटा पॉवरला ही डेडलाईन पाळता आली नाही. संचांची दुरुस्ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. टीव्ही, संगणक, दूरध्वनीही बंद पडल्याने नागरिक संतापले होते. रुग्णालयांत तर आणीबाणीची परिस्थिती होती. प्रभादेवीतील सिद्धिविनायक परिसरातही गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी पाणीही चढवता आले नाही. त्यामुळे विजेसोबतच पाणीटंचाईचाही सामना करावा लागला.

पारेषण यंत्रणेची कोंडी पारेषण वाहिनीतून वीज आणण्याच्या सध्याच्या यंत्रणेच्या मर्यादेमुळे मुंबईत अतिरिक्त वीज आणणे शक्‍य झाले नाही. त्यामुळेच मुंबईत भारनियमन करण्याची पाळी आली. आयोगाच्या आदेशानुसार बंद असलेल्या टाटा पॉवरच्या संच क्रमांक सहामधून वीजनिर्मितीसाठी कंपनीने तयारी केली होती; पण ग्राहकांवर युनिटला 13 रुपये दराचा बोजा पडला असता. म्हणूनच बेस्टने टाटा पॉवरला महागड्या विजेसाठी नकार देऊन ग्राहकांवरील बोजा टाळला.

Post Bottom Ad