पालिकेचे अनुज्ञापन खात्याला आली जाग
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचे नेते, निवडणूक चिन्ह, पक्षाचा झेंडा असलेल्या दिनदर्शिका लावण्यात येतात. अश्या दिनदर्शिकेमुळे पक्षांची फुकटची प्रसिद्धी होते तसेच निवडणूक काळात आचारसंहिता असताना मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यामुळे पालिका कार्यालयातून राजकीय पक्षांच्या नेत्यांची छायाचित्र, पक्षाचा ध्वज व निवडणूक चिन्ह असलेल्या दिनदर्शिका तव्रीत हटवण्यात याव्यात असे आदेश अनुज्ञापन विभागाने दिले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी माहिती अधिकारातून पालिकेच्या कार्यालयात व अधिकाऱ्यांच्या दालनात विविध राजकीय पक्षांचे नेते, पक्षाचे निवडणूक चिन्ह, पक्षाचा झेंडा असलेल्या दिनदर्शिका लावण्यात येतात. या दिनदर्शिका लावण्याबाबत पालिकेने कोणते नियम बनवले आहेत, या अश्या दिनदर्शिकांच्या जाहिराती मधून पालिकेला किती महसुल मिळतो, अश्या दिनदर्शिका लावण्याची परवानगी नसल्यास किती लोकांवर पालिकेच्या ३२८ अ चे पोटकलम (१) अन्वये कारवाही करण्यात आली याची सविस्तर माहिती मागविली होती.
माहिती अधिकारात माहिती मागवल्यावर जागे झालेल्या अनुज्ञापन कार्यालयाने पालिकेच्या कोणत्याही कार्यालयात किंवा अधिकाऱ्यांच्या दालनात राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो असलेले, निवडणूक चिन्ह तसेच झेंडा असलेल्या दिनदर्शिका लावू नयेत. एखाद्या आस्थापनेची जाहिरात अश्या दिनदर्शिकेवर असली तरीही त्या दिनदर्शिका लावू नयेत, अश्या दिनदर्शिका लावण्यात आल्या असल्यास त्वरित काढून टाकाव्यात व या पुढेही अश्या जाहिराती लावू नयेत. पालिका कार्यालयामधून फक्त शासकीय व निमशासकीय प्राधिकरणाद्वारे प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकाच लावण्यात याव्यात असे आदेश देण्यात आलेले आहेत.