मुंबई - देशाच्या आणि दलितांच्या विकासासाठी मोदींसोबत जाण्याचा मी निर्णय घेतला आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजपसोबतच लढणार आहे, अशी घोषणा रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज केली आहे. त्यामुळे भाजप रिपाईला आपल्यासोबतच ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत माझी चर्चा सुरू होती. त्यानंतर दलितांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा देण्याचे आम्ही ठरवले आहे, असे आठवलेंनी स्पष्ट केले. भाजपला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात रिपाईला केंद्रात मंत्रीपद आणि राज्यातील सत्तेत वाटा देण्यात येणार आहे. सध्या आम्हाला आठ जागा मिळणार असून आम्ही आणखी दोन-तीन जागांसाठी आग्रही आहोत असे आठवलेंनी स्पष्ट केले. त्यामुळे सत्तेत वाटा आणि मंत्रीपदाच्या अमिषावर रिपाइंला सोबत ठेवण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे