घाटकोपर-विक्रोळी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2014

घाटकोपर-विक्रोळी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

मध्य रेल्वेवर मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस घाटकोपर-विक्रोळी स्टेशनांच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने संपूर्ण मार्गावरील वाहतुकीस तब्बल चार तासांपेक्षा जास्त काळ फटका बसला. 'मरे'च्या गोंधळामुळे सायंकाळपर्यंत ६९ फेऱ्या रद्द झाल्याने सायंकाळी उशीरापर्यंत सेवा विस्कळीत झाली होती. या गोंधळामुळे ठाण्याहून दादर, सीएसटी गाठण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता.एकीकडे टाटा वीजनिर्मिती संच बंद पडल्याने शहराच्या अनेक भागात कामे विस्कळीत झाली असतानाच, रेल्वे विस्कळीत झाल्याने लाखो मुंबईकरांचे मंगळवारी प्रचंड हाल झाले.

घाटकोपर-विक्रोळी स्टेशनदरम्यान सकाळी ७.१६ वाजता ओव्हरहेड वायर तुटून दोन्ही मार्गांवरील सेवा पूर्णतः विस्कळीत झाली. लोकल जागीच थांबल्याचे पाहून शेकडो प्रवाशांनी रुळांवरून चालण्याचा पर्याय निवडला. चार तासांपेक्षा जास्त काळ वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. या काळात अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकलच्या तब्बल ६९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यापैकी कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ४० फेऱ्यांचा समावेश होता.

किमान सायंकाळपर्यंत 'मरे' सुरळीत होईल, असा होरा चुकीचा ठरला. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही वाहतूक सुरळीत होण्यास सायंकाळ झाली. त्यात, ६९ फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडल्याने दुपारीही गाड्या सुमारे एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.

Post Bottom Ad