राष्ट्रवादी स्वबळावर ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2014

राष्ट्रवादी स्वबळावर ?

लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलली असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १४४ जागांच्या मागणीची काँग्रेसने साधी दखलही घेतलेली नाही. राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला सुमारे १५ दिवस उलटूनही काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेसाठी साधे उत्तरही राष्ट्रवादीला पाठवलेले नाही. परिणामी, येत्या शनिवारी मुंबईत प्रचाराचा नारळ फोडताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याची भूमिका जाहीर करण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीचे काम जवळपास संपले असून १७४ मतदारसंघातील उमेदवारांची नावे त्यांनी नक्की केली आहेत. ती नावे केंद्रीय संसदीय पक्षाकडे पाठविली जाणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी दोन्ही काँग्रेस नेत्यांची २० ऑगस्टला नवी दिल्लीत चर्चा झाली होती. त्या बैठकीस काँग्रेस नेते ए. के. अँटनी, अहमद पटेल तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीने काँग्रेसकडे १४४ जागांची मागणी मांडली. तथापि, राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला ११४पेक्षा एकही जादा जागा देण्यास तयार नाहीत. तसेच सूत्रांच्या म्हणण्यानुसार १७४ जागांवरील उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण केल्याने राष्ट्रवादीला अधिकच्या जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी नसल्याचाच सिग्नल काँग्रेस पक्षाकडून दिला जात असल्याचे दिसते आहे. १ सप्टेंबरला काँग्रेसने हुतात्मा चौकापासून प्रचाराला सुरुवात केली. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला अद्याप काँग्रेसने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. १५ दिवसांच्या काळात कोणतीही चर्चा झालेली नाही, यास राष्ट्रवादीचे प्रवक्ते आ. नवाब मलिक यांनी दुजोरा दिला. तथापि, जागावाटपाच्या वाटाघाटीची चर्चा सुरू होईल, असा आशावाद मलिक यांनी बोलून दाखवला. पवार हे परदेश दौऱ्यावरून शुक्रवारी परत येत आहे. त्यानंतर याबाबतच्या घडामोडी होण्याची लक्षणे आहे. अन्यथा शनिवारच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रचार मेळाव्यात पवार संभाव्य आघाडीविषयी जाहीर भाष्य करण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

Post Bottom Ad