शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी ? शिवसेनेचा शुक्रवारी मोठा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2014

शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी ? शिवसेनेचा शुक्रवारी मोठा निर्णय

मुंबई- येत्या 19 सप्टेंबरला म्हणजेच शुक्रवारी शिवसेनेच्या राज्यातील सर्व बड्या नेत्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत बैठकीस पाचारण केले आहे. यात नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, संपर्क नेते आदी सर्व स्तरातील नेत्यांना बैठकीस पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडण्याचे यातून स्पष्ट संकेत दिल्याचे मानण्यात येत आहे. आज सकाळी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेने वेगळे लढू नये असे वक्तव्य केल्याने शिवसेना शुक्रवारी मोठा निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे. 
 
भाजप 135 जागांवर ठाम आहे तर शिवसेनेनेही 150 पेक्षा एकही कमी जागा लढविणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. त्यातच सोमवारी उद्धव ठाकरेंनी भाजपला 135 जागा देणे केवळ अशक्य आहे. मित्रपक्षाला हे मान्य असेल तर ठीक अन्यथा इतर पर्याय उपलब्ध आहेत असे म्हटले होते. यानंतर भाजप आक्रमक आहे व स्वबळाची भाषा करीत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपच्या वर्तणूकीला आता कंटाळले आहेत. भाजप हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे. तो कोणत्याही मार्गातून दगाबाजी करू शकतो. ऐन वेळीत भाजप स्वबळाची भाषा करेल किंवा जागावाटपांत नमते घेतले तरी शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात कटकारस्थान रचून भाजपपेक्षा शिवसेनेच्या जागा कमी कशा येतील यासाठी खेळी करेल अशी भीती शिवसैनिकांना वाटत आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक व नेते भाजपशिवाय लढण्याचा विचार बोलून दाखवत आहेत. महायुतीतील काही घटकपक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जावे असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.
 
या रणनितीचा भाग म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना मातोश्रीवर बोलवून सविस्तर चर्चा केल्याचे कळते. यावेळी स्वबळावर लढायचे झाल्यास त्यांचा कल कोठे असेल हे जाणून घेतले. यावेळी रामदास आठवलेंनी महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. भाजप व शिवसेना हे पारंपारिक दोन पक्ष स्वतंत्र लढल्यास फायदा होणार नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्ता हस्तंगत करेल, त्यामुळे वेगळा लढण्याचा विचार करू नये, असे उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे कळते. जागावाटपांबाबत आम्ही जर 10 पावले मागे येत असू तर तुम्ही 2 पावले मागे येण्यास काय हरकत आहे अशी प्रतिक्रिया सेना-भाजपला उद्देशून आठवलेंनी दिली आहे. आठवलेंनी अशी प्रतिक्रिया दिल्याने उद्धव यांनी त्यांच्याकडे खासगीत वेगळे लढण्याबाबत चर्चा केली असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
 
दरम्यान, महायुती झाली अथवा नाही झाली तर शिवसैनिकांनी व नेत्यांनी निवडणुकीला सामोरे जाताना काय खबरदारी घ्यावी याबाबत शुक्रवारच्या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे. भाजपसोबत महायुती झाली तरी भाजपचे खासकरून मराठवाडा व विदर्भातील नेते शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात दगाफटका करू शकतात. त्यासाठी निवडणुकीच्या काळात शिवसैनिकांना डोळ्यात तेल घालून काम करावे अशा सूचना दिल्या जाणार असल्याचे कळते.

Post Bottom Ad