मुंबई - मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालयांमधील कर्मचार्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याद्वारे होणार्या इन्फेक्शनमुळे कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये कर्मचार्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे असा निष्कर्ष नवी मुंबईतील एमजीएम कॉलेजमधील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केल्यानंतर काढला आहे.
चैत्राली केवणे, जीनल पटेल आणि धनश्री हिदाऊ या तीन विद्यार्थिनींनी नरीमन पॉईंट, कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, मालाड, पवईमधील कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये हे सर्वेक्षण केले. १५३ कर्मचारी व अधिकार्यांच्या मुलाखती घेतल्या. मनुष्यबळ, प्रशासन, खरेदी विभागातील अधिकार्यांचा यात समावेश होता. मनुष्यबळ विभागातील ९२ टक्के अधिकार्यांनी पिण्याच्या पाण्यातून इन्फेक्शन झाल्याने कर्मचार्यांचे गैरहजेरीचे प्रमाण वाढले असल्याची माहिती सर्वेक्षणात दिली.
९० टक्के कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी प्रशासकीय विभागाची आहे. पण ७२.५ टक्के प्रशासकीय अधिकार्यांना पाण्याद्वारे इन्फेक्शन होते याचीच माहिती नव्हती असे सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. ६५ टक्के कार्यालयांमध्ये वॉटर प्युरिफायर आहेत पण प्युरिफायरची स्वच्छता वर्षातून एकदाच केली जाते. ३५ टक्के कार्यालयांमध्ये ब्रॅण्डेड कंपन्यांचे बाटलीबंद पाणी पुरवले जाते. कोणत्या कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याचा दर्जा चांगला आहे हे कोणालाच निश्चित माहीत नाही.असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.