महायुतीकडून बौद्धांवर अन्यायच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2014

महायुतीकडून बौद्धांवर अन्यायच

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मधील महानगर पालिकेच्या महापौर पदाची निवडणूक ९ सप्टेंबरला होत आहे. महापौरपदाची यावेळची निवडणूक बौद्धांसाठी अतिशय महत्वाची अशी आहे. आरक्षणाच्या नियमा प्रमाणे अशी संधी १० वर्षांनी येते. या निवडणुकीमध्ये बौद्धांना संधी मिळेल असे वाटत असताना शिवसेनेने बौद्धांचा पत्ता कापून आम्ही बौद्धांना किंमत देत नाही असाच संदेश दिला आहे. 

मुंबईच्या महापौर पदाच्या रेस मध्ये अनुसूचित जाती मधील यामिनी जाधव, भारती बावधणे व स्नेहल आंबेकर या तिघी नगरसेविका होत्या. यापैकी  यामिनी जाधव, भारती बावधणे या दोघी बौद्ध समाजाच्या तर स्नेहल आंबेकर या चर्मकार समाजाच्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दक्षिण मध्य मुंबई मधून चर्मकार समाजाच्या राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. यामुळे आता महापौरपदी बौद्ध उमेदवार दिला जाईल अशी चर्चा पसरली होती. 

या चर्चेला शुक्रवारी ब्रेक लागला आणि महापौर पदासाठी चर्मकार समाजाच्या स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी देण्याचे घोषित करण्यात आले. बौद्ध समाजाच्या नगरसेविका यामिनी जाधव व भारती बावदाने यांना उमेदवारी देण्यात आली नाही. याबाबत सखोल चौकशी केल्यावर या दोन्ही बौद्ध महिला नागेसेविक उच्च शिक्षित होत्या. या दोघी पैकी एकीलाही महापौर पद दिले असते तर पक्षाला ते डोईजड झाले असते म्हणून या दोघींना नाकारून स्नेहल आंबेकर यांना जास्त अनुभव नसलेल्या महापौर पद देण्यात आले आहे. 

स्नेहल आंबेकर यांना हे पद देताना शिवसेनेने बौद्धांना नाकारले आहे तर पक्षामध्ये डोईजड होणाऱ्या नगरसेवकानाही संदेश दिला आहे. यामुळे शिवसेनेमध्ये शिवसैनिक कितीही जातीभेद होत नाही आम्ही सगळे शिवसैनिक असतो असे म्हणत असले तरी हा जातीभेद सर्वाना खुले आम दिसत आहे. शिवसेनेने एकिकडे महायुती केली असताना बौद्धांचा रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले असताना दुसरीकडे मात्र बौद्धांवर अन्याय सुरूच ठेवला आहे. एकीकडे शिवसेनेने आपल्याच पक्षातील बौद्धांवर अन्याय करायचे सुरूच ठेवले असताना अशीच परिस्थिती आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची केली आहे. 

तसे बघायला गेल्यास शिवसेना आणि बौद्ध समाजाचे कधीही पटलेले नाही. नामांतर असो व इतर काही घटना असो शिवसेनेने नेहमी बौद्ध समाजाच्या मागण्यांना विरोधच केला. अशी परिस्थिती असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने शिवसेनेबरोबर युती केली. हि युती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मला शिर्डीमध्ये लोकसभेच्या वेळी पडले म्हणून केली असे आठवले सांगत असले तरी आठवलेंची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठीच केली आहे हे समोर येवू लागले आहे. 

२०१२ मध्ये महायुतीमधून निवडणूक लढवणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला सपाटून मार खावा लागला होता. २०१४ च्या निवडणुकीमध्ये याची पुनरावृत्ती झाली आहे. आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कधीही आचार संहिता लागण्याची चिन्ह आहेत. अजून आठवले यांना किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आठवले यांना महायुती केल्या पासून सतत जागांसाठी भिक मागावी लागत आहे. ५९ जागा मागणारे आठवले आता १२ ते १५ जागा मिळाल्या तरी आम्ही घेवू असे बोलू लागले आहेत. लोकसभेमध्ये एकाही पक्षाने महाराष्ट्रातून बौद्ध समाजाचा एकही खासदार निवडून दिलेला नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी याची पुन्हा पुनरावृत्ती होणार आहे. 

आठवले यांची इतकी वाईट परिस्तिथी बघून आठवले गटातील कार्यकर्ते साहेबांचे हे काय चालले आहे अशी चर्चा खाजगी मध्ये करू लागले आहे.आठवले यांना खासदारकी देतानाही असेच दोन वर्षे झुलवत ठेवण्यात आले होते. शिवसेनेबरोबर महायुती करणाऱ्या आठवले यांना शिवसेनेने आपल्या कोठ्यातून खासदारकी दिलेली नाही. शेवटी खासदारकी साठी शिवसेनेने आठवले यांना भाजपकडे हात पसरायला लावले होते. या सर्व घटना बघता हे महायुती वाले बौद्धांना कोणते दिवस दाखवत आहेत याचा विचार प्रत्तेक बौद्धाने करण्याची गरज असून येत्या निवडणुकीमध्ये मतांच्या माध्यमातून याचे उत्तर द्यावेच लागेल. 

अजेयकुमार जाधव (मो. ९९६९१९१३६३)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad