पुणे : विद्यार्थ्यांना केवळ पदवी शिक्षण देऊन न थांबता मल्टीस्कील विकसित करणारे शिक्षण देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. याशिवाय भविष्यात तंत्रज्ञानाची मदत घेऊन नवीन शिक्षणक्रम सुरु करण्यात येतील. आगामी शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राच्या वतीने आज पुण्यातील बी.एम.सी.सी महाविद्यालयात नूतन कुलगुरूंचे स्वागत आणि पुणे व सातारा जिल्ह्यातील प्राचार्य, केंद्र संयोजक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पुणे विभागीय केंद्र व अभ्यास केंद्रांच्या वतीने कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. उत्तम भोईटे, सी.टी.बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार निकम, पुणे विभागीय केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. शरणकुमार लिंबाळे हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले की, जागतिकस्तरावर होणारी वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांना केवळ एका स्किलवर नोकरी मिळत नाही. म्हणून स्कील बेस शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. विद्यार्थ्यांना पाहिजे तेव्हा, पाहिजे तेथे, पाहिजे ती परीक्षा देणारी ए थ्री संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पुढील काळात विशेष भर दिला जाईल.
डॉ. उत्तम भोईटे म्हणाले की, पुढील काळात विद्यापीठाने काही शिक्षणक्रम विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढविणारे हवेत. त्याचप्रमाणे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विद्यापीठ परिवारात निर्माण करणे आवश्यक आहे. व्यक्ती आणि समाजाचा विकास साधण्यासाठी मुक्त शिक्षण प्रणाली हे प्रभावी माध्यम आहे. शिक्षणाची समानसंधी मिळवून देण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून भविष्यात विद्यापीठाच्या यशाचा आलेख उंचावेल अशी आशा व्यक्त केली.