बांद्रा कुर्ला कोम्लेक्स येथील भारत नगर मधील पालिकेच्या शाळा २०१० मध्ये धोकादायक ठरवून पाडण्यात आल्या आहेत. २०१० मध्ये या पाडलेल्या शाळांच्या पुनर्बांधणीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
भारत नगर मधील पालिकेच्या शाळांमधून १६०० विद्यार्थी शिकत असून हि शाळा २०१० मध्ये पाडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जवळच एका ९ वर्गखोल्या असलेल्या चाळीमध्ये हि शाळा सुरु ठेवण्यात आली आहे. ९ पैकी ७ खोल्यांमध्ये ३७ तुकड्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. त्यसाठी एकाच वर्गात तीन भिंतींवर तीन फळे लावून तीन वर्ग चालवण्यात येत आहेत.
गेल्या चार वर्षात या शाळेच्या समोरच एक सप्ततारांकित हॉटेल उभारण्याचे काम सुरु असल्याने या शाळेच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांच्याशी संपर्क साधला असता स्कूल इंफ्रास्ट्रक्चर सेलशी संपर्क साधला असून लवकरच या शाळेची इमारत बांधण्याचे काम सुरु केले जाईल असे सांगितले आहे.