केंद्र सरकारने कांदाची आयातीवर त्वरित बंदी घालावी तसेच निर्यातीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. कांद्याची आयात आणि घसरलेल्या दरावरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र समितीचे प्रमुख आमदार भाई जयंत पाटील यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची योग्य ती दखल न घेतल्यास आगामी निवडणुकीत त्यांना त्याची जागा महाराष्ट्रातील शेतकरी दाखवुन देतील असा इशारा आमदार भाई जयंत पाटील यांनी बोलताना दिला .
याआधी कॉंग्रेस सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवल्याचे मोठे भांडवल केले. कांद्याची महागाई नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवरील शुल्क दोन वेळा टप्प्या-टप्प्याने वाढवले आणि बाहेरून तो आयात केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा बळी देऊन निर्यात शुल्क वाढवल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. आता त्याच्या निर्यातीवर अनुदान द्या,अशी मागणी आहे, असे शेकाप चे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील म्हणाले. शेतकऱ्याला परवडतील असा दर कांद्याला द्या; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.