उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे युती तुटण्यामागची कारणं उपस्थितांसमोर मांडली. जागावाटपाबाबत वाटाघाटी कशाप्रकारे सुरु होत्या, याची माहितीही दिली. भाजपला मुख्यंमत्रीपद हवं होतं, असं ते म्हणाले. शिवसेनेने भाजपला १८-१९ जागा सोडल्या होत्या. परंतु ते ३५ जागा अधिक मागत होते. इतक्या जागा सोडणं शिवसेनेला शक्य नव्हतं, असं ते म्हणाले. युती तुटल्याचा शिवसेनेला आनंद होत नाहीए. परंतु युती तुटणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव होतं की सुदैव?, हे तुम्हीच ठरवा असं उद्धव म्हणाले.
लोकसभेत नरेंद्र मोदींना शिवसेनेने साथ दिली म्हणूनच युतीच्या ४८ पैकी ४२ जागा निवडून आल्या. आता लोकसभेसारखी मोदींची लाट आता राहिलेली नाही. पोटनिवडणुकीच्या निकालांवरून हे स्पष्ट झालय. लाट काय असते हे तुम्हाला आम्ही दाखवूच, असं आव्हान उद्धव यांनी भाजपला दिलं. युती तोडून भाजपने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलेली असल्याची टीका उद्धव यांनी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले शिवसेनेच्या सोबतीला आल्यास त्यांना उपमुख्यंमत्रीपद देण्यात येईल, अशी खुली ऑफर उद्धव यांनी दिली.
उद्धव म्हणाले की मी विधानसभा निवडणूक का लढवत नाही, असं अनेकजण विचारतात. परंतु शिवसेनेची सत्ता आली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात जाऊन निवडणूक लढवेन. मुंबईतील रेसकोर्सवर शहरवासियांसाठी भव्य उद्यान तसं मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर १०० एकर जागेवर गरीबांसाठी घरं बांधण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.