मुंबई - स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या कामगारांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत आणि ती स्वच्छ असावीत, अशी मागणी "राईट टू पी‘ या चळवळीमार्फत सुरू आहे. याला अनुसरूनच महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.
स्वच्छतागृह स्वच्छ राहिले तर काय होईल आणि ते अस्वच्छ ठेवल्यास काय होईल, तसेच कशा प्रकारे सफाई करावी, याविषयीची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी बैठकीत सांगितले. झोन-दोनची ही बैठक होती. या वेळी एफ (दक्षिण), एफ (उत्तर), जी (दक्षिण) आणि जी (उत्तर) या विभागांतील स्वच्छतागृहांची माहिती घेण्यात आली.
या झोनमध्ये महिलांच्या 34 स्वच्छतागृहांत 101 शौचकूप आहेत. आणखी 25 शौचकुपांची आवश्यकता आहे, असे या बैठकीत समजले.
महिलांसाठी मोफत शौचकूप असल्याबाबत फलक लावण्याचे निर्देश देण्याचा निर्णय आरटीपीचे कार्यकर्ते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. सुलभ संस्थेने 17 ठिकाणी असे फलक लावले आहेत.
"राईट टू पी‘ हा सर्वांचा अधिकार आहे. त्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे. इच्छुकांनी चेंबूरमधील "कोरो‘ कार्यालयात 13 सप्टेंबरला जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्ता- कोरो फॉर लिटरसी, ट्रेनिंग ऍण्ड रिसोर्स सेंटर, अण्णा भाऊ साठे उद्यानासमोर, शिवसेना शाखेजवळ, सायन-ट्रॉम्बे मार्ग, सुमननगर, चेंबूर, मुंबई. दूरध्वनी-25295002-103