राज्यात १५ ऑक्‍टोबरला मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2014

राज्यात १५ ऑक्‍टोबरला मतदान

मुंबई - राज्यात 15 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 91 लाख 82 हजार युवा म्हणजे 18 ते 24 वयोगटातील मतदार आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये प्रथमच राज्यातील 13 मतदारसंघांत "व्हीव्ही पॅट‘ म्हणजे (व्होटर्स व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल) ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे मतदाराला आपण कोणाला मतदान केले हे समजणार आहे. 

राज्यात 4 कोटी 36 लाख 27 हजार 956 पुरुष, 3 कोटी 96 लाख 2 हजार 799 महिला, 1071 इतर असे एकूण .........8 कोटी 25 लाख 91 हजार 826 मतदार..... आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी दिली. विधानभवन पत्रकार कक्षात ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात एकाच दिवशी मतदान होणार असून 90 हजार 403 मतदान केंद्रे असणार आहेत. आढाव्यानंतर संवेदनशील मतदान केंद्रे जाहीर करण्यात येतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती. निवडणूक आयोगाने या मतदारांना पत्रे पाठवून नावे नोंदविण्याचे आवाहन केले होते. यापैकी 1 लाख 3 हजार मतदारांनी आपली नावे पुन्हा नोंदविली आहेत. आतादेखील मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दिवसाच्या 10 दिवस आधी म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीत नावनोंदणीचा अर्ज सादर करता येईल, असे नितीन गद्रे यांनी सांगितले.

राज्यातील 13 मतदारसंघांत प्रथमच व्हीव्ही पॅट 
राज्यातील 13 ठिकाणी व्हीव्ही पॅट पद्धत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर मतदाराला त्याने कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचे नाव समोरच्या मशिनमध्ये दिसणार आहे. त्याची माहिती असणारी पेपर स्लिप मतदाराला त्या यंत्रात दिसणार आहे, मात्र ती त्याच्या ताब्यात देण्यात येणार नाही. औरंगाबाद, अमरावती, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अहमदनगर, भंडारा येथील काही मतदारसंघांत ही व्हीव्ही पॅट यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे नितीन गद्रे यांनी सांगितले.

Post Bottom Ad