288 जागांवर चाचपणी पूर्ण- माणिकराव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2014

288 जागांवर चाचपणी पूर्ण- माणिकराव ठाकरे

288 जागांवर चाचपणी पूर्ण- माणिकराव ठाकरे; काँग्रेसचा राष्ट्रवादीवर दबाव कायम
मुंबई/ नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 288 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत आघाडी असल्याने आमच्या कोट्यातील 174 जागांची यादी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच उर्वरित 114 जागांबाबतही लवकरच हायकमांड निर्णय घेतील अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी जास्तीच्या जागांच्या मागणीच्या दबावाला काँग्रेस बळी पडणार नाही असे संकेतच काँग्रेसने यातून दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही याबाबत अद्याप तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीची आज सकाळी बैठक पार पडली. त्याआधी छाननी समितीच्या तीन वेळा बैठक-चर्चा झाल्या आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. यात राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत काही मतदारसंघांची अदलाबदल आणि काँग्रेसच्या 174 उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी आणि कॉँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नारायण राणे उपस्थित होते. राज्यात विधानसभेच्या काही मतदारसंघांत उमेदवारीबाबत वाद सुरू आहेत. त्याचा निवाडा कसा करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने काही मतदारसंघ बदलून मागितले आहेत त्याबाबत या नेत्यांनी विचारविमर्श केला. काही विद्यमान उमेदवारांना बदलण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादीला किती जागा सोडायच्या याबाबत अद्याप एकमत झालेले दिसून येत नाही. दरम्यान, काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला 128 पर्यंत जागा सोडू शकतो असे सांगितले जात आहे.

Post Bottom Ad