दक्षिण मुंबईचा पाणीप्रश्‍न सुटला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2014

दक्षिण मुंबईचा पाणीप्रश्‍न सुटला

मुंबई - दक्षिण मुंबईतील रहिवासी कमी दाबाने होणाऱ्या व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले होते. महापालिकेने 100 किलोमीटरचे जलबोगदे तयार केल्यामुळे पाणीपुरवठा आणि वितरण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती जल अभियंता विभागाने दिली आहे. इतक्‍या लांबीचे जलबोगदे तयार करणारी मुंबई ही देशातील एकमेव महापालिका असल्याचा दावा या विभागाने केला आहे. 


पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी गारगई, पिंजाळ आणि दमणगंगा या नव्या प्रकल्पांवर महापालिकेची भिस्त आहे. वाढत्या लोकसंख्येची भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील, असा विश्‍वास आयुक्त सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला आहे. मध्य वैतरणा प्रकल्प पूर्ण झाला असून तीन नवे प्रकल्पही हाती घेण्यात येत आहेत. नवी धरणे तयार झाल्यावर मिळणाऱ्या पाण्याचे वितरण करणारी व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या जलबोगद्यांची आवश्‍यकता होती. या व्यवस्थेअंतर्गत जमिनीखाली 55 ते 60 मीटरवर बोगद्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. काही बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे दक्षिण मुंबईतील पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा झाल्याचे जल अभियंता विभागाने सांगितले. काही बोगदे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. जलबोगद्यांच्या कामासाठी अनेक अभियंते काही वर्षांपासून राबत आहेत.
मुंबईची सध्याची पाण्याची गरज दररोज 4290 दशलक्ष लिटर असून 3760 दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. पुढील 25 वर्षांतील पाण्याची गरज लक्षात घेऊन नवे प्रकल्प विकसित करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त कुंटे यांनी व्यक्त केला. त्यासाठी जलबोगद्यांचे जाळे वेगाने पूर्ण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

- मुंबईतील चार जलबोगद्यांसाठी 1035 कोटींची तरतूद.
- तानसा जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी 193 कोटी 50 लाख.

Post Bottom Ad