थकबाकीदार लालबागच्या राजाला पालिकेचा आशीर्वाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2014

थकबाकीदार लालबागच्या राजाला पालिकेचा आशीर्वाद

मुंबईच्या लालबाग येथील गणेशोत्सव साजरा करणाऱ्या करोडपती मंडळावर पालिका भलतीच मेहेरबान झाल्याचा प्रकार माहिती अधिकार कायकर्ते महेश उर्फ बाळा वेंगुर्लेकर यांनी मिळवलेल्या माहिती मधून उघड झाला आहे.आमचा गणपती नवसाला पावतो व मुंबई मधील सर्वात श्रीमंत असा आमचा गणपती आहे असे मिडिया मधून सांगणाऱ्या अव सगळीकडे प्रचार करणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाने मुंबई महानगर पालिकेचा २३ लाख रुपयांचा दंड गेल्या दोन वर्षामध्ये भरलेलाच नाही. 

मुंबई लालबाग येथील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ हे सर्वात श्रीमंत असे गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखले जाते. नवसाला पावणारा गणपती म्हणून याची प्रसिद्धी मिडिया मधून प्रचार केला जात असल्याने या मंडळाच्या गणपतीकडे लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. आमच्या गणपतीला शेकडो किलो सोने, चांदी आणि करोडो रुपये रोख म्हणून दान दिले जाते असे या गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी सांगितले जाते. तश्या बातम्या प्रसिद्ध करून आणल्या जातात. 

अश्या या करोडपती गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोस्तव साजरा करण्यासाठी रस्ते आणि पदपथावर खड्डे खोदण्याची परवानगी पालिकेकडून मागितली जाते. भला मोठा असा मंडप उभारला जातो. यासाठी ठिकठिकाणी खड्डे पाडले जातात. सन २०१२ मध्ये या मंडळाने ठीक ठीकाणी एकूण ९५३ खड्डे खोदले होते. परंतू गणेशोत्सव संपल्यावर रस्त्यावर पदपथावर पाडलेल खड्डे या मंडळाने बुजवलेच नाहीत. 

पालिकेच्या नियमानुसार मंडप काढल्यानंतर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची जबाबदारी संबंधित गणेशोत्सव मंडळाची आहे. मंडप बांधण्यासाठी पाडलेले खड्डे बुजवले नाही तर पालिका अश्या मंडळाला दंड आकारते. सन २०१२ मध्ये पालिकेच्या एफ -  दक्षिण विभागाने सार्वजनिक मालमात्त रस्ते पदपथावर खड्डे मारल्याबद्दल लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला २३ लाख ५६ हजार रुपयांचं दंड आकारला आहे. परंतु हा दंड लालबागच्या राजाने गेल्या दोन वर्षात पालिकेकडे जमा केलेला नाही. अशी माहिती एफ दक्षिण विभागाच्या परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता म. ल. रायकवाड यांनी माहिती अधिकारातून दिली आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार लालबागच्या राजा मंडळाकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांना गणेशोत्सव काळात सोन्याचे नाणे दिले जाते. या मिळणाऱ्या सोन्याच्या नाण्याला जागणाऱ्या पालिकेच्या एफ दक्षिण विभागातील काही अधिकाऱ्यांनी तुम्ही दंड भरूच नका आपण नंतर काय ते पाहून घेवू असे सांगितल्याने पालिकेच्या दंड वसुलीच्या नोटीसीला लालबागच्या राजा मंडळाने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे अद्याप या मंडळावर कोणतीही कारवाही केलेली नसल्याने मंडळाकडून दंड वसूल करण्यास पालिकेचा एफ दक्षिण विभाग अपयशी ठरला आहे. 

करोडपती मंडळ २३ लाखाचा दंड भरत नसल्याने मंडळाकडील दंड वसूल करण्याबाबत कायदेशीर कारवाही करून दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी कायदा विभागाला पत्र लिहून केली आहे. कायदा विभागाने दंड वसूल करण्यासाठी मगणी करणारे विभाग कार्यालयाचे पत्र येवूनही गेल्या दोन वर्षात पहावी अशी ठोस कारवाही केलेली नाही. करोडपती अशी स्वताची प्रसिद्धी करून घेणाऱ्या या मंडळाला २३ लाख रुपयेही भरता येत नाहीत मग या मंडळाकडून खोटी प्रसिद्धी करण्यात येते का असा प्रश्न सध्या मुंबईकर नागरिकांना पडला आहे. 

गेले दोन वर्षे पत्रव्यवहार होत असला तरी नुसती चर्चा करण्यात वेळा वाया घालवला जात आहे. पालिका मुख्यालयातील उप कायदा अधिकारी सावला यांनी मी याबाबत चर्चा करा असे एफ दक्षिण विभाग कार्यालयातील कायदा अधिकाऱ्यांना सांगितले होते परंतू त्यांनी काहीही उत्तर पाठवले नाही असे सांगितले. तर उप कायदा अधिकारी पी. व्ही. नाईक यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधल्यावर यामध्ये काय कारवाही करणार त्यांची संपत्ती कुठे आहे हेच माहित नाही, आम्ही काही कारवाही केली तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहित नाहीत का अशी उडवा उडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. 

दरवर्षी करोडो रुपयांचे दान मिळाले, कित्तेक किलो चांदी आणि सोने मिळाले असे वृत्तपत्रातून आणि वृत्त वाहिन्यावरून वरून बातम्या प्रसिद्ध होत असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाची किती संपत्ती आहे याची नोंद नाही. याचा अर्थ लालबागच्या राजा मंडळाचे कार्यालय किंवा इतर जी संपत्ती बेकायदेशीर आहे असे म्हणायला काही हरकत नाही. पालिकेकडे लालबागच्या राजा मंडळाच्या संपत्ती किवा इतर जागांबाबत नोंद नाही असा कायदा विभाग बोलत असेल तर पालिकेने अद्याप या बेकायदेशीर संपत्तीवर कारवाही का केली नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. 

पालिकेच्या वार्ड किवा मुख्यालयातील कायदा विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यांना पालिकेचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी हा दंड वसूल करण्याची इच्छाच नसल्याचे उघड होत आहे. दर वर्षी या मंडळाला खड्ड्यांसाठी लाखो रुपयांचा दंड बसवला जात आहे. परंतू पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि दंड वसुली करण्यास भिणाऱ्या वार्ड आणि कायदा विभागातील अधिकाऱ्यांमुळे पालिकेला लाखो रुपयांच्या दंडाच्या रक्कमेवर पाणी सोडावे लागत आहे. 

पालिकेचे अधिकारी प्रशासन चुकत असेल तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी सत्ताधार्यांची असते. पालिकेचे अधिकारी दंड वसूल करण्यास अपयशी ठरले आहेत. अश्यावेळी सत्ताधार्यांनी पुढाकार घेवून दंड वसूल करून घ्यायला हवा होता. परंतू पालिकेचा लाखो रुपयांचा दंड थकवणाऱ्या मंडळाकडून दंड वसुली करण्याचे सोडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुंबईचे महापौर सुनील प्रभू या मंडळाच्या सीडीच्या प्रकाशन सोहळ्याला १३ ऑगस्ट ला उपस्थित होते. 

या कार्यक्रमात मंडळाची स्तुती करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि सुनील प्रभू यांनी दंड वसूल करण्यासाठी एक चकार शब्दही काढलेला नाही. पालिकेचा लाखो रुपयांचा दंड हे मंडळ भरत नाही हे माहित असतानाही सत्ताधारी असलेल्या ठाकरे आणि प्रभू यांनी आधी पालिकेचा दंड भरा मगच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येतो असे ठणकावून सांगण्याची गरज होती. परंतू असे काहीही या सत्ताधार्यांनी केलेलं नाही. पालिका अधिकारी आणि सत्ताधार्यांनी असे प्रकार केल्यास ज्यांच्याकडेही पालिकेची थकबाकी असेल ती थकबाकी कशी वसूल होणार असा प्रश्न सामान्य मुंबईकर नागरिकांकडून विचारला जात आहे. 

अजेयकुमार जाधव ( मो. ९९६९१९१३६३ )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad