१०८ हेल्पलाइनवरील ऍम्ब्युलन्सच्या मदतीचा पोकळ दावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2014

१०८ हेल्पलाइनवरील ऍम्ब्युलन्सच्या मदतीचा पोकळ दावा

मुंबई - रेल्वे प्रवाशांचे वाढते अपघात व न्यायालयाच्या आदेशा नंतर सर्व रेल्वे स्थानकांवर राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने १०८ या हेल्पलाइनवर ऍम्ब्युलन्स उपलब्ध केला. परंतू हा  देखावा म्हणजे पोकळ दावा असल्याचे सिद्ध झाले आहे. 

सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर हार्बरच्या मार्गावर जखमी झालेल्या प्रवाशाला वैद्यकीय मदत पोहचविण्यासाठी संबंधित स्थानकाने १०८ वर कॉल करून ऍम्ब्युलन्सची मदत मागितली असता त्यांना सॅण्डहर्स्ट रोड स्थानक महाराष्ट्रात आहे का? असा सवाल या हेल्पलाइनवरील सहाय्यकाने केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून हे दुसरे स्थानक असल्याचे सांगताच भानावर आलेल्या पुण्याच्या कॉलसेंटरने मॅसेज पाठवला. परंतू ऍम्ब्युलन्सवर डॉक्टरच उपलब्ध नसल्याने अखेर जखमी प्रवाशाला टॅक्सीने जे. जे. रुग्णालयात पोहचविण्यात आले. 

सँडहर्स्ट रोड स्थानकात स्टेशन उपअधीक्षक विनायक शेवाळे यांना हार्बरच्या ३ व ४ नंबर मार्गामध्ये जखमी प्रवासी पडल्याचा कॉल आला. त्याला वैद्यकीय मदत मिळावी म्हणून ऍम्ब्युलन्स हेल्पलाइन १०८ला त्यांनी कॉल केला. १०८ हेल्पलाइनचे कॉलसेंटर पुण्याला असून तेथील सहाय्यकाने सँडहर्स्ट रोड स्थानक महाराष्ट्रात आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर हे स्थानक मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकापासून दुसरे स्थानक असल्याचे त्यांनी सांगताच या सहाय्यकाला जाग आली आणि त्यांना पुढे मॅसेज पाठविला.

जखमी प्रवाशाच्या डोक्याला व खांद्याला मार लागला असल्याने शेवाळे यांनी तातडीने टी. सी. ऑपरेटिंग कर्मचार्‍याला डोंगरी येथे ऍम्ब्युलन्सजवळ पाठविले. तेथील चालकाने आपल्याला मॅसेज आला नसून डॉक्टरसुद्धा उपलब्ध नसल्याचे उर्मट उत्तर दिले. त्यानंतर शेवाळे यांच्या ड्युटीवेळी स्थानकांत पॉइंटस्मन तसेच हमालसुद्धा नव्हते. हार्बरचा पोलीस हवालदारही नसल्याने अखेर मेनलाइनच्या पोलीस हवालदारास सोबत घेऊन खासगी टॅक्सीने जखमी प्रवाशाला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आल्याचे शेवाळे यांनी सांगितले. राज्य सरकारच्या १०८ हेल्पलाइनच्या ऍम्ब्युलन्स बाबत बेपर्वाईविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात आपण लेखी तक्रार केल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

Post Bottom Ad