घाटकोपर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीचा लढा घाटकोपर येथील चिराग नगरमध्ये असणार्या आपल्या घरापासून सुरू केला होता. या घराकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे; परंतु मनसेचे घाटकोपरमधील विभागाध्यक्ष दिलीप लांडे यांनी साठेंच्या घराचे नूतनीकरण करून भावी पिढीसमोर हा ऐतिहासिक ठेवा चिरंतर राहावा, यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचे मातंग समाजाकडून तसेच लोकशाहिरांकडून कौतुक होत आहे.
घाटकोपर, चिराग नगरमधील घरातून अण्णा भाऊ साठेंनी स्वातंत्र्याच्या लढय़ाची स्फुलिंगे चेतवली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ासाठी अण्णांनी डफावर थाप टाकून अख्खा महाराष्ट्र चेतवला. शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागवली. या महान साहित्यरत्नाचे घर दुर्लक्षित होते. या घराचे स्मारक करावे, अशी मागणी झाली, मात्र सरकारकडून त्याची उपेक्षा झाली. मनसे विभागाध्यक्ष दिलीप लांडे यांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन अण्णा भाऊ साठेंच्या कर्मभूमीचे नूतनीकरण केले. मनसेच्या भारती मोरे, कविता वाळुंज, शिवाजी कदम, संगीता हुले, अशोक काळे, चंद्रकांत नागटिळक यांनी या कार्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनसेतर्फे अण्णा भाऊ साठेंच्या कार्याला मनसेने एक प्रकारे अभिवादन केले आहे.