मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या शिवडी येथील विशेष टीबी रुग्णालयात काम करणाऱ्या दोन वर्षांत 38 कामगारांना क्षयरोगाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने याची गंभीर नोंद घेतली आहे. यापुढे ज्या कामगारास क्षयरोगाची बाधा झाली आहे, तो बरा होत नाही तोपर्यंत त्याला विशेष सुट्टी देण्यात येणार असल्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कामगारांना आजारातून पूर्ण बरे होण्यास मदत होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील कामगारांना क्षयरोगाची बाधा होत असल्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या कामगारांना विशेष सुट्टी द्यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी यापूर्वी केली होती. मात्र, सध्या रुग्णालयातील कामगारांची संख्या पाहता, सरसकट सुट्टी न देता, नवीन कामगारांना तीन महिने, जुन्या कामगारांना सहा, तर "एमडीआर‘ झालेल्या कामगारांना सहा ते नऊ महिने सुट्टी देण्यात येते.चिंतेची बाब म्हणजे काही कामगार हे आर्थिक कारणामुळे उपचार अर्धवट सोडतात. अर्धवट उपचारानंतर पुन्हा सेवेत रुजू झाल्यास त्यांना क्षयाची बाधा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या कामगारांना क्षयरोग बरा होईपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे रुग्णालयात सहा नवीन समुपदेशकही नियुक्त केले जाणार आहेत. सध्या रुग्णालयात एक समुपदेशक आहे. रुग्णांसह कामगारांना सकस आहार वाढवून दिला जाणार आहे. रुग्णालयातील कामगारांना आठवड्यातून दोन वेळा एन 95 मास्क देणार आहेत. रुग्णांना ने-आण करण्याकरता नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करणार तसेच मानसेवी पद्धतीने मानसोपचार, मधुमेह व मायक्रोबायोलॉजी ही पदे भरणार असल्याचे डॉ. ननावरे यांनी सांगितले आहे.
पालिका टीडीडी कोर्स सुरू करणार
माणसाच्या शरीरातील कोणत्या अवयवाला क्षयरोगाची लागण झाली हे तपासणीत सिद्ध होते. त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेकरता सध्या तीन डॉक्टर आहेत. आतापर्यंत या डॉक्टरांनी 82 शस्त्रक्रिया पारही पाडल्या आहेत. यावर न थांबता खास फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेकरता टीडीडी कोर्स पालिका सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे या शस्त्रक्रियांकरता भूलतज्ज्ञांचे एक पॅनेल तयार केले जाईल. त्यांना पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.