मुंबई - नवरात्री तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत काही मंडळांकडून होणारी वीजचोरी रोखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष विभाग स्थापन करण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली. या विषयावर पत्रकार केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी न्या. पी. व्ही. हरदास व न्या. श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर झाली. त्या वेळी सरकारी वकिलांनी ही माहिती दिली.
पोलिस उपायुक्त (अंमलबजावणी) या विभागाचे अध्यक्ष असतील. उत्सवादरम्यान मंडळांना मिळणाऱ्या तात्पुरत्या वीजजोडणीवर हा विभाग लक्ष ठेवेल. शहराला वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टचे दक्षता अधिकारी; तसेच मुंबई महापालिकेचा एक प्रतिनिधी असे इतर दोघे सदस्य या मंडळावर असतील. नुकतीच मुंबई पोलिस आयुक्तांनी या विषयावर बैठक घेतली होती. त्यास गणेशोत्सव मंडळ, महापालिका आणि ऊर्जा कंपन्यांचे प्रतिनिधी; तसेच अर्जदार हजर होते. उत्सव कालावधीतील वीजचोरी कशी रोखावी, हाच या बैठकीचा विषय होता. यासंदर्भात अर्जदारांच्या आणखी काही सूचना नसल्यास या बैठकीतील निर्णय आपण स्वीकारू, असेही खंडपीठाने सांगितले.