मुंबई : राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया हे गुरुवारी सेवानिवृत्त झाले व त्यांच्या जागी स्वच्छ व कर्तव्यदक्ष अधिकारी असा लौकीक असणार्या स्वाधीन क्षत्रिय यांची नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मुख्य सचिव सहारिया गुरुवारी निवृत्त झाले. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्याचा सरकारचा विचार होता; पण स्वत: सहारिया यासाठी फारसे उत्सुक नव्हते. शिवाय केंद्रातील भाजपा सरकार मुदतवाढ देण्यास किती अनुकूल असेल, याबाबतही शंका होती. त्यामुळे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून अमिताभ राजन व स्वाधीन क्षत्रिय या दोघांचे नाव चर्चेत आले होते. राजन हे सेवाज्येष्ठतेनुसार प्रथम होते. ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विश्वासातले अधिकारीही होते; पण डिसेंबरमध्ये ते निवृत्त होणार असल्याने त्यांना केवळ चार-पाच महिन्यांचा कालावधी मिळाला असता. त्यामुळे १९८0च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणार्या स्वाधीन क्षत्रिय यांच्या नावाला पसंती देण्यात आली. ते जानेवारीमध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांना या पदावर भरपूर मोठा कालावधी मिळणार आहे.
स्वाधीन क्षत्रिय हे शांत, स्वच्छ व कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. वाशिम येथे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हाधिकारी अशा फिल्ड पोस्टिंगनंतर त्यांनी काही काळ केंद्रात प्रतिनियुक्तीवरही काम केले. विविध खात्यांचे सचिव, म्हाडाचे उपाध्यक्ष, मुंबईसारख्या एखाद्या छोट्या राज्याएवढा पसारा असलेल्या महापालिकेचे आयुक्त अशा महत्त्वाच्या पदांवर काम केल्यावर सध्या ते महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत होते.