"वायफाय' पाठोपाठ थीम पार्क ही "हायजॅक' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2014

"वायफाय' पाठोपाठ थीम पार्क ही "हायजॅक'

मुंबई - शिवसेना-मनसेची एकमेकांविरुद्ध श्रेयवादाची लढाई सुरूच आहे. आधी शिवाजी पार्कमधील "वायफाय‘चा वाद आणि आता भांडुपच्या थीमपार्कचा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 


आज भांडुपमध्ये मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांच्या प्रयत्नातून थीमपार्कचे भूमिपूजन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण त्या आधीच मनसेने "माझे जग‘ या थीमपार्कचे भूमिपूजन करून बाजी मारली आहे. पण हे पार्क मिठागाराच्या जमिनीवर आणि कायदेशीर परवानगी न घेता अनधिकृतपणे उभारले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून या विरोधात कांजूर पोलिसांत तक्रार दिली आहे.
मनसेने मात्र, या पार्कसाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारने 99 वर्षांच्या लीजवर मिठागाराला जागा दिली आहे. हे लीज 2016 पर्यंत वैध असल्याने हे संपूर्ण बांधकामच अवैध असल्याची शिवसेनेची तक्रार आहे. मनसे आमदार मंगेश सांगळे यांच्या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात भांडुपेश्वर कुंडाजवळ दोन हजार स्क्वेअर मीटर जागेवर हे थीमपार्क उभारले जात आहे. मात्र, शिवसेना नेते दत्ता दळवी यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. 

थीमपार्क म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. या प्रकल्पासाठी सॉल्ट कमिशनकडून ना हरकत प्रमाणपत्रदेखील घेतलेले नाही. "मुंगेरी लाल के हसीन सपने‘ असे काही दाखवण्याचा प्रयत्न मनसे करत आहे, असा दावा दत्ता दळवी यांनी केला.
दरम्यान, शिवसेनेचे आरोप धादांत खोटे आहेत. ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे. पालिकेची परवानगी घेऊनच थीमपार्कचे भूमिपूजन केले, असा दावा मनसेचे विभाग अध्यक्ष उदय सामंत यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प डीपीडीसीच्या मदतीने पूर्ण केला जाणार आहे. पण विकासाला केवळ विरोध करणे हे सेनेचे काम आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Post Bottom Ad