कोलकाता - दक्षिण भारतात लैंगिक समानता असली तरी केरळमध्ये 'बालविवाहा'चे प्रमाण वाढले असल्याची माहिती 'युनिसेफ'च्या अहवालातून समोर येत आहे. गेल्या काही वर्षांत केरळ राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे भारतातील युनिसेफच्या ' बाल सुरक्षा तज्ज्ञ' डोरा गियुस्ती यांनी सांगितले.
' काही विशिष्ट समूह व काही वंचित समूदायांमध्ये बाल विवाह ही साधारण बाब आहे,' असे गियुस्ती यांनी स्पष्ट केले. 'केरळमध्ये ही प्रथा आधी नव्हती, मात्र गेल्या काही वर्षांत उत्तरेकडील भागातील नागरिकांचे वास्तव्य वाढल्याने हे प्रमाण वाढले आहे' असेही त्या पुढे म्हणाल्या.
या अहवालातील माहितीनुसार, देशात बालविवाहाची प्रथा सर्वदूर पसरली असली तरी गावांमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. खालच्या जातीत बालविवाह ही अतिशय सामान्य बाब आहे.' युनिसेफच्या अहवालानुसार बालविवाहचे प्रमाण शहरांपेक्षा गावात जास्त दिसून येते. या अहवालानुसार, २० ते २४ वयोगटातील महिलांपैकी गावातील ५२.५ टक्के महिलांचा तर शहरातील २८.२ टक्के महिलांचा विवाह वयाच्या १८ व्या वर्षाआधीच झाला आहे.
बिहारमध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक (६८ टक्के) असून हिमाचल प्रदेशमध्ये ते सर्वात कम ( ९ टक्के) आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये बाल विवाहांच्या प्रमाणात ५१.९ टक्के ते ६८.२ अशी सर्वात जास्त वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.