पुण्याच्या माळीन मध्ये संपूर्ण डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव या डोंगरा खाली गाडले गेले. सकाळी लोक झोपेत असताना असा प्रकार घडल्याने बहुतेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या गावातील काही लोकच वाचली आहेत. असे डोंगर किवा दरडी कोसळण्याचे प्रकार घडले कि मुंबईमधील दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांची चर्चा होऊ लागते. मुंबई मध्ये तब्बल २६३ ठिकाणे अतिधोकादायक आहेत. ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या तर शेकडो हजारो लोकांचा एकाच वेळी मृत्यू होऊ शकतो. अश्या ठिकाणांकडे पालिकेचे आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
पालिका आणि राज्यसरकारच्या यंत्रणांनी दखल घेतली नसल्याने मागील आठवड्यात चेंबूर मधील माहूल गावातील अशोक नगर, वाशी नाका येथील डोंगराचा २० बाय २० फुटाची दरड कोसळून खाली असलेल्या पत्र्याच्या घरांवर कोसळली. या दुर्घटनेत गणेश कुमार कुराडे हा एक सहा मुलगा अडकला होता. त्याला बाहेर काढून उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु वैद्यकीय अधिकार्याने या मुलाला मृत घोषित केले आहे.
मुंबईमध्ये दरडी कोसळणे हा प्रकार तसा काही नवीन नाही. मुंबईमध्ये २००८ पासून २०१३ पर्यंत अद्याप दरड कोसळण्याच्या शहरामध्ये १४, पूर्व उपनगरात ३८, पश्चिम उपनगरात १५ घटना घडल्या असून गेल्या सहा वर्षात २५ जण जखमी झाले आहेत तर १८ जणाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती मुंबई महानगर पालिकेकडून मिळत आहे. गेल्या २१ वर्षात दरडी कोसळल्याने २६० लोकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई मधील दरड कोसळू शकतील अशा २६३ ठिकाणे असून या मध्ये १ लाख ७० हजार लोक राहत आहेत. या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधाव्यात त्यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून तातडीच्या निधीची तरतूद करावी. तसेच पुढील वर्षाच्या अर्थ संकल्पात संवरक्षक भिंती बांधण्यासाठी भरगोस निधीची तरतूद करावी अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईतील दरडींची ६१ ठिकाणे अतिधोकादायक असून येथे संरक्षण भिंत बांधणेही शक्य नसल्याने तेथील रहिवाशांना शक्य तितक्या लवकर हलविणे हाच एकमेव पर्याय असल्याचा अहवाल २०११ मध्ये आयआयटीने म्हाडाला सादर केला होता. त्यानुसार म्हाडाने मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकार्यांना यासंबंधीचे पत्र लिहित अहवालाची अंमलबजावणी करण्याची विनंतीही केली होती, मात्र या अहवालाकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असल्याने हजारो रहिवाशांचा जीव धोक्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
म्हाडाकडे आयआयटीचा अहवाल सादर झाला आहे. त्यानुसार आम्ही बर्याच ठिकाणी रहिवाशांना हलविण्याचे प्रयत्न करीत आहोत, मात्र रहिवासी कोणत्याही परिस्थितीत तेथून इतरत्र जाण्यास तयार नसल्याने आम्हाला हे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होत नसल्याची कबुली उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी दिली आहे. तर मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने केलेल्या सर्वक्षणाअंती ३२७ ठिकाणे धोकादायक आढळली आहेत. संरक्ष्ण भिंतींद्वारे होणार्या झोपड्यांची संख्या १०,३८१ असून तात्काळ स्थलांतरित झोपड्यांची संख्या ९६५७ एवढी आहे.
डोंगर उतारावरील झोपडीधारकांच्या पुनर्वसनासंबंधीचा कृती अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ३४ महिन्यांपूर्वी नगरविकास खात्याला दिले होते. मात्र नगरविकास खात्याने काहीच कार्यवाही केलेली नाही. सुरक्षेची उपाययोजना म्हणून सरकारने दरडीं शेजारी संरक्षण भिंत बांधण्यासाठी १९९२ सालापासून तब्बल २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र संरक्षण भिंती हा कायमस्वरूपी उपाय नसून शासनाने धोकादायक झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए आणि पालिकेच्या ताब्यात असलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेल्या घरांमध्ये करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
डोंगरावर जेसीबी आणि बांधकाम साहित्य नेणे आणि रहिवाशांना हलवून संरक्षण भिंत बांधणे अवघड ठरत असतानाच जिथे संरक्षण भिंती बांधल्या आहेत तिथे त्या भिंतीवर लागलीच घरे बांधली जात असल्याचे निदर्शनास येत असल्याची धक्कादायक माहिती झोपडपट्टी पुनर्वसन मंडळातील एका अधिकार्याने दिली आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी कोणाला जबाबदार ठरवायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अश्या या दरडी कोसळण्याच्या ठिकाणी काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी नेमकी किती लोक होती याची नेमकी आकडेवारी पालिकेच्या आपत्कालीन विभागकडे नाही.
आपत्कालीन परिस्थिती मध्ये नेमके काय करावे व काय करू नये याची एक मार्गदर्शिका पालिकेच्या आपत्कालीन विभागाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मुंबईच्या २४ वार्ड मधील दरडीखाली असलेल्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मुंबईच्या डी, एफ दक्षिण, एफ उत्तर, एच पश्चिम, के पश्चिम, एल, एम पश्चिम, एन, पी उत्तर, आर दक्षिण, आर उत्तर, आर मध्य या १२ वार्ड मध्ये १ लाख ५८ हजार ७१३ लोक दरडीखाली राहत असल्याचे म्हटले आहे. ए, बी, सी, जी उत्तर, एच पूर्व या ५ वार्ड मध्ये दरडी कोसळण्याचे एकही ठिकाण नाही. तर ई, जी दक्षिण, के पूर्व, एम पूर्व, पी दक्षिण, एस, टी या ७ वार्ड मध्ये नेमकी किती लोक या दरडींच्या खाली राहतात याची नेमकी आकडेवारी पालिकेकडे नसल्याने ती आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
मुंबईमधील अश्या ठिकाणी दरड कोसळली तर या दरडीखाली नेमकी किती लोक अडकली, त्या ठिकाणी किती घरे होती, त्या ठिकाणांची नेमकी लोकसंख्या किती याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे व पालिकेकडे नाही. यामुळे अपघात घडल्यावर नेमकी किती आणि कोणत्या प्रमाणात मदत पोहोचवायला हवी यामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते. याची वेळीच दखल घेवून राज्य सरकार मुंबई महानगर पालिका यांनी धोकादायक दरडी खाली आपला जीव मुठीत घेवून आपले आयुष्य जगणाऱ्या लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी या लोकांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करायची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment