दक्षिण मध्य मुंबईतील उड्डाणपुलांची सुधारणा होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 August 2014

दक्षिण मध्य मुंबईतील उड्डाणपुलांची सुधारणा होणार

मुंबई : करी रोड पूल, जगन्नाथ शंकरशेट आणि केशवसूत पूल या तीन उड्डाणपुलांची सुधारणा आणि पुनर्पृष्ठीकरण करण्यासाठी महापालिका तब्बल ९ कोटी ३५ लाख रुपये खर्च करणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत येत्या बुधवारी प्रशासनाकडून मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हे काम करण्यासाठी एकाच कंत्राटदाराने निविदा भरली असूनही हा प्रस्ताव तातडीचे कामकाज समजून स्थायी समिती आणि स्थापत्य समितीला (शहर) मंजुरीसाठी ठेवावा, असे आयुक्तांनी म्हटले आहे. 

अतिपर्जन्यवृष्टी आणि वाहनांच्या वाहतुकीमुळे या उड्डाणपुलांवर खड्डे, खाचखळगे निर्माण होतात, त्यामुळे वाहतूक खोळंबते, यासाठी या उड्डाणपुलांची सुधारणा आणि पुनर्पृष्ठीकरण करण्याचा निर्णय पालिकेच्या प्रमुख अभियंत्यांनी (पूल) घेतला आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन या उड्डाणपुलांची सुधारणा, पुनर्पृष्ठीकरण करण्यासाठी २0१२ मध्ये निविदा मागवल्या होत्या; पण या निविदेस प्रतिसाद न मिळाल्यामुळे या ठिकाणच्या खड्डय़ांची आणि खराब पृष्ठभागाची दुरुस्ती द्वैवार्षिक कंत्राटांमधून करण्यात आली होती. यामुळे हे काम आणि उड्डाणपुलांचे प्रसरण सांधे बदलणे आदी कामे तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार (स्टॅक समिती) मॅकनाईज मास्टीकमध्ये तातडीने करण्यात येणार आहे. या कामांसाठी निविदा मागवल्या होत्या; पण 'एम.ई. इंफ्राप्रोजेक्ट या कंपनीनेच निविदा भरल्यामुळे फक्त त्यांचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे.

Post Bottom Ad