आघाडीवर एकमत - राष्ट्रवादीला १२४ जागा ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2014

आघाडीवर एकमत - राष्ट्रवादीला १२४ जागा ?

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच गेल्या काही दिवसांपासून स्वबळाची भाषा करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधातील तलवारी म्यान करत एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी उभय नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर जागावाटपासंदर्भातील चर्चा येत्या एक-दोन दिवसांत सुरू करून १५ ऑगस्टपर्यंत पूर्णत्वाला नेली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसने १४४ जागांची केलेली मागणी काँग्रेसने स्पष्टपणे फेटाळून लावली असली तरी त्यांना यंदा १0 जागा वाढवून देण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याचे समजते. राष्ट्रवादीला यंदा १२४ जागा देऊन १६४ जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत हीच चर्चा झाल्याचेही म्हटले जात आहे; परंतु यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास दोन्ही पक्षांनी नेत्यांनी नकार दिला.राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून गती आली आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही पक्षांचे राज्यातील नेते मुंबईत भेटले होते. या वेळी दोन्ही पक्षांनी २00९ सालच्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला यंदाही अमलात आणण्याची मागणी केली होती. २00९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७४, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ११४ जागा लढवल्या होत्या. त्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून जागावाटपाचे सूत्र ठरवण्यात आले होते. 

आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अवघे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने अधिक जागांची मागणी करत स्वबळाची भाषा सुरू केली होती. राष्ट्रवादीच्या बहुताशी ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून 'एकला चलो'ची हाक देण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे लावून धरला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ५0-५0 म्हणजे १४४-१४४ जागा लढवण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच ही मागणी मान्य नाही झाली तरी स्वबळावर लढू, असा इशाराही या जोडीने दिला होता. त्यामुळे काँग्रेसनेदेखील आक्रमक पवित्रा स्वीकारत राष्ट्रवादीपुढे नमते न घेता सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सन्मानजनक जागावाटप झाले तरच आघाडी होईल, अन्यथा नाही, असे खडसावले. राष्ट्रवादीला १४४ जागा कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. त्याचे पडसाद दिल्लीत उमटले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आघाडीबाबतची चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये तासभर बैठक झाली. या वेळी विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याचे दोन्ही नेत्यांनी निश्‍चित केले आहे. मात्र कोण किती जागा लढणार यावर अद्यापि काही चर्चा झाली नाही. जागावाटपाची चर्चा दिल्लीस्तरावरच होणार असून, दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेतेच या चर्चेमध्ये सहभागी होतील, असे म्हटले जात आहे. १५ ऑगस्टनंतर प्रत्यक्ष जागावाटपाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.

Post Bottom Ad