केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करताना डॉट भारत डोमेनची सुरूवात केली आहे. इंटरनेटवर हिंदी भाषेत काम करणाऱयांसाठी ही आनंदाची बाब आहे. हिंदी भाषेत इंटरनेटचा वापर करणारे आता त्या वेबसाईटचे यूआरएल हिंदीमध्ये लिहू शकणार आहेत, ज्या डॉट भारतसोबत रजिस्टर करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत डॉट इन डोमेनच्या माध्यमातून इंग्रजी वेबसाईट शोधल्या जातात. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते बुधवारी डॉट भारत या डोमेनचे उद्घाटन करण्यात आले. याची सुरूवात नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे देवनागरीत असणाऱया या डोमेनमध्ये हिंदी सोबतच बोडो, डोगरी, कोकणी, मैथिली, मराठी, नेपाळी आणि सिंधी भाषेमध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो. डॉट भारत या डोमेनसाठी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू टाइप करण्याची गरज नाही. राष्ट्रपतींची वेबसाईट राष्ट्रपती.सरकार.भारत असी असणार आहे.
डॉट भारत हे डोमेन नेम घेण्यासाठी ट्रेड मार्क व्हेरिफिकेशन असणार आहे. याचे शुल्क 250 रुपये आणि सेवा शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचे हे पाऊल डिजिटल इंडियाला पूढे घेऊन जाणारे आहे. भारत सरकार संपूर्ण देशाला वायरलेस टेलीफोनी आणि ब्रॉडबॅन्ड नेटवर्कने जोडण्यासाठी काम करत आहे. या अंतर्गत पाच वर्षांत 55 हजार खेडय़ांना मोबाईल कनेक्टिव्हीटी पुरविण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्याचे ठरविले आहे.