मुंबई : जिल्हा निवडणूक आयोगाने केलेल्या फेरपडताळणीनंतर मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत ४६ हजार ८३५ नव्या मतदारांची भर पडली आहे. याआधी शहरातील मतदारांची संख्या २३ लाख ८० हजार ४१७ इतकी होती. मात्र नव्या मतदारांमुळे आता ती २४ लाख २७ हजार २५२ इतकी झाली आहे.
याआधी लोकसभा निवडणुकीत सुमोटो घेत निवडणूक आयोगाने लाखो मतदारांची नावे याद्यांतून वगळली होती. त्यामुळे अनेक मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने आयोगाला मतदार याद्यांची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ९ ते ३० जूनदरम्यान १० विधानसभा मतदारसंघांतील फेरपडताळणी करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी ४८ हजार ४४३ मुंबईकरांनी नव्याने अर्ज दाखल केले होते. त्यातील १ हजार ६११ अर्ज अपात्र करण्यात आले. तर ४६ हजार ८३२ अर्ज पात्र करण्यात आले. याव्यतिरिक्त ४ अनिवासी भारतीयांनीही नावनोंदणी करण्यासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातील तीन अर्जदारांचा अर्ज पात्र ठरवण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण ४६ हजार ८३५ मुंबईकरांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत.