लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारा मुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती आधारे तक्रार दाखल केल्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी गंभीर दखल घेत विधी व न्याय विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांनी मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने दंड न भरणे, बेकायदेशीर बांधकाम करणे, पालिकेच्या उद्याने आणि क्रीडांगणे यांचे नुकसान करणे अश्या बेकायदेशीर कृत्याकडे दुर्लक्ष केले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते बाळा उर्फ महेश वेंगुर्लेकर यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहिती नुसार लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाला सन २०१२ मध्ये मंडप बांधण्यासाठी ९५३ खड्ड्यांच्या बदल्यात २३ लाख ५६ हजार रुपयांचा दंड बसवण्यात आला होता. अद्याप मंडळाने भरलेला नाही. तसेच सन २०१३ मध्ये मंडळाला ५ लाख ६० हजार ६३८ रुपयांचा दंड बसवण्यात आला आहे. सन २०१२ व २०१३ मध्ये २९ लाख १६ हजार ६३८ इतक दंड आणि नुकसान भरपाईची रक्कम अद्याप या मंडळाने पालिकेकडे भरणा केलेली नाही.
पालिकेच्या नियमानुसार ज्या गणेशोत्सव मंडळानी मागील दंड भरला नसेल अश्या मंडळांना मंडप बांधण्यास परवानगी देवू नये असा नियम करण्यात आला होता. लालबागचा राजा मंडळाने १९ लाखाचा दंड ठकावला असला तरी पालिका अधिकारयानी पालिकेचा नियम केराच्या टोपलीत टाकून मंडळाला या वर्षीही मंडप उभारण्यासाठी खड्डे पडण्यास परवानगी दिलेली आहे. याबाबत एफ दक्षिण आणि कायदा विभागातील अधिकारी मुग गिळून गप्प बसले असल्याने लालबागचा राजा मंडळाचे चांगलेच फावले आहे.
मंडळाकडून दादागिरी केली जाते असा आरोप होत असतो, हे सत्य आता समोर आले आहे. सन २०१३ मध्ये गणेशोत्सव दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ( गरमखाडा ) मैदानामध्ये ठिकठिकाणी भिंती तोडण्यात आल्या होत्या, मैदानात शौचालये उभारण्यात आली होती हि जागा पुर्ववत केली नसल्याने मंडळाची अनामत रक्कम पालिकेने जप्त केली आहे. दिनशा पेटीट लेन येथील मनोरंजनाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर या वर्षी पालिकेने परवानगी नाकारली असतानाही अनधिकृत वापर केला जात आहे. या मैदानाची भिंत मंडळाने आपल्या मर्जीने तोडून टाकली आहे. याबाबत पालिकेने फक्त नोटीस देवून कारवाही करण्याचा इशारा देण्याचे काम केले आहे असे माहिती अधिकारात कळविण्यात आले आहे.