मुंबई : गेल्या महिन्यात दडी मारलेल्या पावसाने आपले 'अस्तित्व' हळूहळू दाखवण्यास सुरुवात केली असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या जलाशयांतील साठय़ात वाढ होऊ लागली आहे. यामुळे गेल्या आठवड्यात मोडक सागर आणि या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तानसा जलाशयही दुपारी १२ वाजता 'भरभरून' वाहू लागला. मात्र पालिकेने केलेली १0 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
पावसाचे गेल्या आठवड्यात दमदार आगमन झाल्यानंतर २८ जुलै रोजी तुळशी तलाव, ३0 जुलै रोजी मोडकसागर आणि सोमवारी तानसा हे मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 'ओव्हरफ्लो' झाल्यामुळे पालिकेच्या जल विभागाच्या अधिकार्यांना हायसे वाटले आहे. तर कृत्रिम पावसाचा प्रयोगही करण्याची आवश्यकता नाही, असे पालिका आयुक्तांचे म्हणणे आहे. तीन महत्त्वाचे जलाशय भरून वाहण्यास सुरुवात झाली असली, तरी अप्पर वैतरणा आणि भातसाही पूर्णपणे भरून वाहिल्यानंतर मुंबईकरांची पुढील वर्षीचीही 'तहान' यामुळे भागणार आहे, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. मोडकसागर भरून वाहू लागला असल्याने सध्या पालिका त्यातून 'ओव्हरफ्लो' होणारे पाणी उचलून ते मुंबईकरांपर्यंत पोहचवत आहे, असे हा अधिकारी म्हणाला. भातसा आणि अप्पर वैतरणा भरून वाहण्याची क्षमता अनुक्रमे १४२.0७ आणि ६00.८0 दशलक्ष लिटर्स आहे. सध्या सर्व जलाशयांमध्ये १0 लाख २६ हजार ५७६ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा आहे.