बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱयांच्या सुखदुःखात आर्थिक दृष्टया त्यांच्या पाठीशी व वेळोवेळी राहणाऱया, अनेकवेळा राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या 'दि म्युनिसिपल को.ऑ.बँक लि., मुंबई' च्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.९७ टक्क्यांची वाढ झाली असून ठेवींमध्ये तब्बल २२.७८ टक्क्यांची वाढ झाली आहे अशी माहिती `दि म्युनिसिपल' बँकेचे कार्याध्यक्ष व महापालिकेचे उप आयुक्त मिलिन सावंत यांनी दिली.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. सीताराम कुंटे यांनी `दि म्युनिसिपल'को.ऑ.बँकेकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगत बँकेच्या एकंदरीत प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले असून यापुढेही बँकेच्या सर्वांगिण विकासासाठी संचालक मंडळ धडाडीने कार्यरत राहिल असे आश्वासन महापालिका बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान वार्षिक अहवाल सादर करताना बोलत होते.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१३-१४ या आर्थिक वर्षात बँकेचे खेळते भाग-भांडवल २१९४.६१ कोटींवरुन १४.८९ टक्क्यांनी वाढून आज २५२१.३४ कोटींवर पोहचले आहे. तर बँकेचे भाग भांडवल देखील १३१.०८ कोटींवरून ५.५९ टक्क्याने वाढून १३८.४१ कोटींवर पोहचले आहे. बँकेकडे गेल्या आर्थिक वर्षात १५४०.५१ कोटींच्या ठेवी होत्या त्यामध्ये तब्बल २२.७८ टक्क्यांची वाढ होऊन त्या ठेवी आता १८९१.४७ कोटी इतक्या झाल्या आहेत. तर बँकेने वाटप केलेल्या विविध कर्जांची एकूण रक्कम १४३२.५७ कोटींवरून ४.१६ वाढून १४९२.१६ कोटींवर पोहचली आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये देखील ६.९७ टक्क्यांची वाढ झालेली आली आहे, गेल्या आर्थिक वर्षात ३५.१३ कोटी इतका असणारा निव्वळ नफा यावर्षी ३७.५८ इतका झाला आहे.
बँकेचे भांडवल, नफा, ठेवी, वाटप केलेली कर्जे यामध्ये लक्षणीय सुधारणा होत असतानाच बँकेच्या अनुत्पादक मालमत्तेमध्ये अर्थात ढोबळ एन.पी.ए. मध्ये ३.७७ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. गेल्यावर्षी ३३.३८ इतके असणारे ढोबळ एन.पी.ए. चे प्रमाण चालू आर्थिक वर्षात ३२.१२ वर आले आहे. ही एक निश्चितच सकारात्मक बाब असून बँकेचा नक्त एन.पी.ए. निरंक आहे व या सर्व प्रगतीमागे बँकेच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि सभासदांचा व ग्राहकांचा बँकेवर असणारा विश्वास हेच सकारात्मक कारण आहे, असे प्रतिपादन देखील बँकेचे कार्याध्यक्ष मिलिन सावंत यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान केले.