मुंबई : कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श को-ऑप. सोसायटीचे बांधकाम हे लष्कराच्या भूखंडावरील एकमेव अतिक्रमण नसून संपूर्ण महाराष्ट्रातील अंदाजे १५१२ एकर इतका लष्कराचा भूखंड अतिक्रमणबाधित असल्याची धक्कादायक आकडेवारी प्रकाशझोतात आली आहे. लष्कराच्या भूखंडावर अतिक्रमण करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसर्या क्रमांकाचे राज्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आदर्श घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयामार्फत सुरू असलेल्या उच्चस्तरीय चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे.
काही राजकीय नेते तसेच बड्या सनदी अधिकार्यांच्या सहभागातून कुलाब्यात बहुमजली आदर्श सोसायटी उभी राहिली. या सोसायटीतील कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आल्याने हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजले आहे. ही वादग्रस्त सोसायटी लष्कराच्या भूखंडावर उभी असल्याचा संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे. घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीदरम्यान महाराष्ट्रातील लष्कराच्या भूखंडावरील अतिक्रमणाची सद्यस्थिती उघडकीस आली आहे. राज्यातील अतिक्रमणबाधित १५१२ एकर भूखंडापैकी ७७.१४ एकर भूखंड एकट्या मुंबई शहरातील आहे. देश पातळीवरील अतिक्रमणाचा विचार करता पहिल्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश राज्यात लष्कराच्या ३१४२ एकर भूखंडावर, तर दुसर्या क्रमांकावरील मध्य प्रदेशमध्ये १५४२ एकर भूखंडावर अतिक्रमण झाले आहे.
यासंदर्भात संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी खासदार पूनम महाजन यांना लेखी उत्तराद्वारे विस्तृत माहिती दिली आहे. संपूर्ण देशात लष्कराच्या ११.४५५ एकर भूखंडावर अतिक्रमण झाल्याचेही त्यांनी कळवले आहे. लष्कराच्या भूखंडावरील अतिक्रमण हटवून ती जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेणे संरक्षण मंत्रालयासाठी मोठे आव्हान आहे. संबंधित अतिक्रमणे हटवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने नवीन धोरण आखले पाहिजे, असे मत एका वरिष्ठ अधिकार्याने व्यक्त केले.