मुंबई - इमारतींच्या प्रस्तावाला मंजुरी देताना महापालिकेच्या यंत्रणांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे "कॅम्पा कोला‘सारखी अतिक्रमणे होत आहेत. अशी अतिक्रमणे यापुढे होऊ नयेत, या दृष्टीने पालिका प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी आज महापालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी प्रशासनाकडे केली.
‘कॅम्पा कोला‘चा विषय न्यायप्रविष्ट आहे. महापालिकेने वीज आणि पाणी कापण्याची कारवाई केली; मात्र ही अतिक्रमणे वाचविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. अशी अतिक्रमणे होऊच नयेत, या दृष्टीने काळजी घ्यायला हवी. त्यासाठी पालिकेच्या विकास आराखडा विभागाने दिलेल्या प्रमाणपत्रात इमारतीचा तपशील दिलेला असावा. प्रमाणपत्रातील इमारतीच्या आराखड्यानुसार बांधकाम होत आहे की नाही, याची अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. भोगवटा प्रमाणपत्र देतानाही नियमांचे उल्लंघन होत आहे का, याची तपासणी केली जावी. अशी परिपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली तरच यापुढे "कॅम्पा कोला‘सारखी अतिक्रमणे होणार नाहीत, असे मत आंबेरकर यांनी मांडले. याबाबत ते ठरावाची सूचनाही मांडणार आहेत.