नासाने दरड कोसळण्याचा इशारा दिला होता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2014

नासाने दरड कोसळण्याचा इशारा दिला होता



मुंबई - अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा) या अंतराळ संस्थेने भीमाशंकर परिसरातील माळीण दुर्घटनेच्या एक दिवस आधीच अतिवृष्टी व दरड कोसळण्याची शक्यता वर्तविली होती, असे स्पष्ट झाले आहे. मात्र हवामान विभागाने व एकूणच सरकारी यंत्रणेने तो इशारा गांभीर्याने घेतला नव्हता, त्यामुळे माळीणचे गावकरी हे सरकारी सुस्तीचे बळीच ठरले आहेत. 


२५ ते ३१ जुलैदरम्यान महाराष्ट्राच्या भीमाशंकरच्या माळीण परिसरात २४ तास अतिवृष्टीचा इशारा नासाच्या पाहणीमध्ये देण्यात आला होता. त्याचप्रमाणे १७५ मिमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली होती. २९ जुलै रोजी रात्री ९ वा. यासंबंधातील नकाशाचित्रही प्रसृत करण्यात आले होते. पश्‍चिम घाटाचा उत्तरेकडील भाग व अगदी गुजरातपर्यंतचा विस्तारित भाग येथे जोरदार पाऊस पडण्याचाही इशारा देण्यात आला होता. त्याचा परिणाम लक्षात घेता ३० जुलैच्या नकाशामध्ये नासाने दरड कोसळणे, भूस्खलन होण्याची शक्यता असणारी ठिकाणेही स्पष्ट केली होती. त्यात माळीण हे अतिशय स्पष्टपणे जांभळ्या रंगात दाखविले होते. इतके होऊनही या सर्वाची साधी दखलही हिंदुस्थानातील हवामान खाते वा भूगर्भशास्त्र विभागाने कशी घेतली नाही, असा प्रश्‍न पडतो.

अशा प्रकारचे ऍलर्ट पाहण्याची जबाबदारी नेमकी कोणाची याचा शोध घेतला असता दिल्ली विभाग ते पाहतो, असे सांगून पुणे वेधशाळेने हात वर केल्याचे समजते. दिल्लीच्या आयएमडीने ही जबाबदारी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियावर ढकलून हात झटकले आहेत. मात्र या सार्‍या सरकारी शुक्राचार्यांच्या व बाबूंच्या जबाबदार्‍यांच्या ढकलाढकलींमुळे माळीण येथील दुर्घटनेपूर्वी तेथील लोकांना वेळीच इशारा देऊन सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम मात्र होऊच शकले नाही, हे या एकंदर यंत्रणेने दु:खावर दिलेला डाग आहे, असेच स्पष्ट होत आहे.

देशातील काही भागांमध्ये अशा प्रकारच पाऊस पडू शकतो, त्यातही पश्‍चिम घाट भागात होणार्‍या पावसाच्या या मुसळधार वृष्टीबरोबरच भूस्सखलन वा दरडी कोसळण्याची शक्यता नासा टीआरएमएम यांनी ३० जुलैला नकाशाद्वारे दाखविली होती. भीमाशंकर व माळीण या भागावर या नकाशामध्ये तसे संकेत जांभळ्या रंगात देण्यात आले असल्याचे स्पष्ट दिसतात. धरणांच्या सभोवताली असणार्‍या परिसरात अशा प्रकारच्या दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात, असाही तज्ज्ञांचा दावा आहे. भूगर्भातील पाण्याचा स्रोत, धरणातील पाणी पातळी व अन्य संकेत यामागे कारणीभूत असल्याचे मानले जाते. डिंभे धरण हाही त्यातलाच भाग असल्याचे जाणकारांचे मत आहे.

- नासाच्या इशार्‍याकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष करण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या ढगफुटीची माहितीही अशीच दुर्लक्षित केली गेली होती.

Post Bottom Ad