आरक्षित भूखंड क्‍लब आणि सोसायट्यांनी गिळले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2014

आरक्षित भूखंड क्‍लब आणि सोसायट्यांनी गिळले

मुंबई - क्‍लब आणि सोसायट्यांनी महापालिकेची मैदाने आणि उद्यानासाठीचे राखीव भूखंड गिळंकृत केल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या सभागृहात आज उघड झाली. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, आरक्षित भूखंड वर्षांनुवर्षे बळकावले जात असल्याची माहितीच पालिकेच्या अधिकाऱ्यांना नाही. आज सदस्यांनी सभागृहात याबाबतचा पोलखोल केला तेव्हा सारेच अवाक्‌झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

शिवसेनेचे नगरसेवक अनिल सिंह यांनी राखीव भूखंडप्रकरणी हरकतीचा मुद्दा सभागृहात मांडला होता. मलबार हिलमध्ये ब्रीच कॅन्डी क्‍लब असून, त्यांनी पालिकेचा आरक्षित भूखंड गिळंकृत केला आहे; मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्याबाबत माहिती नाही. मलबार हिलमधील असे अनेक आरक्षित भूखंड विविध सोसायट्या आणि क्‍लबनी बेकायदा बळकावले आहेत, ते ताब्यात घ्या, अशी मागणी सिंह यांनी केली. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा दिला. "चेंज ऑफ युजर‘च्या नावाखाली अनेक भूखंड बळकावले असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. दादर आणि प्रभादेवीमध्ये शाळेच्या जागेसाठी आरक्षण आहे. त्या जागाही भलतेच कोणी वापरत आहेत. तेथे शाळा बांधा, अशी मागणीही त्यांनी केली. मैदाने आणि उद्यानांचे धोरण अजूनही संमत झालेले नाही. कुणाच्या दबावाखाली हे धोरण राखून ठेवले आहे, असा सवाल समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला.

Post Bottom Ad