नवी दिल्ली : देशात रोजगार असलेल्यांची संख्या गेल्या आठ वर्षांमध्ये २०१३ पर्यंत ३४.३५ टक्क्यांनी वाढून १२.७७ कोटी झाली आहे. काल प्रसिद्ध झालेल्या सहाव्या आर्थिक गणनेतील आकडेवारीनुसार, रोजगारवाढीचा वार्षिक दर या काळात ४ टक्के एवढा होता. या काळात वार्षिक लोकसंख्यावाढीचा दर २ टक्के एवढा होता.
देशातील एकूण रोजगारांपैकी ११.२६ टक्के रोजगार एकट्या महाराष्ट्रात आहेत. कामावर असलेल्या लोकांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. यानंतर उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. आर्थिक गणनेत प्रथमच यावेळी हातमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचा समावेश करण्यात आला. देशभरात या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे प्रमाण ३.७५ टक्के आहे.
२००५ च्या तुलनेत शहरी भागात रोजगार २०१३ च्या तुलनेत ३७.४६ टक्क्यांनी वाढून ६.१४ कोटी झाले. दुसरीकडे ग्रामीण भागात ३१.५९ टक्क्यांनी वाढून ६.६२ कोटी राहिले. केंद्रशासित प्रदेशांत २०१३मध्ये दिल्लीत सर्वाधिक २९.८४ लाख नोकरदार आहेत. यानंतर २.३८ लाख कर्मचाऱ्यांसह चंदीगडचे स्थान राहिले. पुडुचेरीत २.१७ लाख कर्मचारी होते.२०११च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या १२१ कोटींहून अधिक होती. आर्थिक गणनेत कृषी, लोक प्रशासन, संरक्षण आणि अनिवार्य सामाजिक सुरक्षा सेवा यांचा समावेश करण्यात आला नाही. या क्षेत्रांचा यात समावेश केल्यास रोजगारवाढीचे प्रमाण घटेल. २००५ ते २०१३ या काळात संस्था किंवा कंपन्यांची संख्या ४१.७३ टक्क्यांनी वाढून ५.८४ कोटी राहिली. यामध्ये ६० टक्के आस्थापने ग्रामीण भागात आहेत.
रोजगारवाढीत उत्तर प्रदेशची बाजी उत्तर प्रदेशात याच काळात रोजगारवाढीचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक नोंदले गेले. लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगारमध्ये मणिपूर, आसाम आणि सिक्कीम यांच्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. यात गुजरात नवव्या स्थानावर आहे. रोजगार स्थितीबाबत विचारले असता, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे चेअरमन प्रणव सेन यांनी सांगितले की, आठ वर्षांत रोजगारामध्ये ३४ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली. म्हणजेच वार्षिक ४ टक्क्यांहून अधिक दराने रोजगारात वाढ झाली. लोकसंख्येत वार्षिक २ टक्के दराने वाढ नोंदली.