मुंबई - धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. मुंबईसह राज्यभरात आंदोलकांनी आज चक्काजाम केला. आंदोलकांनी कुर्ला स्थानक येथे रेलरोको करत ठाण्याला जाणारी लोकल रोखल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला होता. काही आंदोलकांनी तर चक्क रेल्वे रुळांवर आडवे पडून आरक्षणासाठी जोरदार घोषणा दिल्या.
नवी मुंबईतील कळंबोली येथेही चक्काजाम करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली. पुण्यातही धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून चांदणी चौक येथेही रास्तारोको करण्यात आला. दरम्यान बारामतीमध्ये आंदोलकांनी दुकांनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या घटनेनंतर शहरात अघोषित बंद पुकारण्यात आला आहे. नगर मनमाड हायवेवरही आंदोलनकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली आहे. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत न झाल्याने नाराज झालेल्या कृती समितीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबईसह राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.