मार्डच्या संपाचा संमिश्र परिणाम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2014

मार्डच्या संपाचा संमिश्र परिणाम

मुंबई - निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेच्या (मार्ड) दिवसभराच्या संपाचा संमिश्र परिणाम आज दिसला. दिवसभरात सुमारे 100 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, तर 150 शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या. शनिवार असल्याने शस्त्रक्रियांवर विशेष परिणाम झाला नसल्याचे रुग्णालयांमधील वरिष्ठ डॉक्‍टरांनी सांगितले. 

मार्डने पुकारलेल्या एकदिवसीय संपात राज्यभरातील 14 वैद्यकीय महाविद्यालय आणि 3 महापालिका रुग्णालये सहभागी झाली होती. सायन रुग्णालयात दिवसभरात 27 शस्त्रक्रिया झाल्या. तर रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये 910 जणांनी उपचार घेतले. जे. जे. रुग्णालयात 87 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर 40 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. दिवसभरात रुग्णालयात 91 जणांना दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नायर रुग्णालयाने या संपात सहभाग घेतला नव्हता.
दरम्यान, सेंट्रल मार्डचे सरचिटणीस डॉ. हर्षोल्हास पानशिवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्डचा दिवसभराचा संप पुढे सुरू ठेवण्याबाबत रात्री जे. जे. रुग्णालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. मार्डने पुकारलेला एक दिवसाचा संप रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. वाघचौरे यांनी दिली.

डॉ. किरण जाधव यांच्या कुटुंबाला मार्डतर्फे प्रत्येक निवासी डॉक्‍टरच्या एका दिवसाचा स्टायपेंड देण्यात येणार असल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. संतोष वाघचौरे यांनी दिली. यातून डॉ. जाधव यांच्या कुटुंबाला सुमारे 35 ते 40 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच शासनातर्फे 50 लाख रुपयांची मदत डॉ. जाधव यांच्या कुटुंबाला देण्यासाठी अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. डॉ. किरण जाधव यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात्याच्या बदलीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री करणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री आव्हाड यांनी मार्डला दिल्याचे कळते.

Post Bottom Ad