नागपूर- नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासह केंद्र सरकारच्या अनेक विकास योजनांच्या शुभारंभाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (गुरुवार) नागपुरातून विधानसभा निवडणुकीच्या विदर्भातील प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे शासकीय स्वरूपाच्या या कार्यक्रमांवर निवडणूक प्रचाराचा राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या महिनाअखेर लागू होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जाणार्या विकास योजनांचा शुभारंभ आणि लोकार्पणाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत प्रचाराचा बार उडवून देण्याची भाजपची योजना आहे. नागपुरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पारडी येथील भूमिगत पुलाच्या कामांचे भूमिपूजन तसेच मौदा येथील एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील दुसर्या संचाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी आणि पीयूष गोयल या केंद्रीय मंत्र्यांची या वेळी उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने नागपूर ग्रामीणमधील मौदा तसेच नागपुरात कस्तुरचंद पार्कवर जाहीर स्वरूपात हे कार्यक्रम होणार आहेत. या दोन्ही सभास्थळांवर हजारोंची गर्दी जमवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.
मोदींच्या स्वागतासाठी शहरात किमान दोनशे ठिकाणांवर होर्डिंग्ज लावले जाणार आहेत. सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून सुमारे पाच हजार पोलिस सुरक्षेसाठी शहरात तैनात राहणार आहेत. विमानतळावर सर्वोच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार आहे.