रेल्वेतील प्रवाशांना फेसबुकवर करता येणार तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2014

रेल्वेतील प्रवाशांना फेसबुकवर करता येणार तक्रार

रेल्वेतील महिलांची छेडछाड असो वा चोरीच्या घटना, प्रवाशांना यासंबंधी तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची आवश्‍यकता नाही. कारण आता फेसबुकवर अशा तक्रारी करता येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी यासाठी वेबपेज तयार केले असून, लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यावर नजर ठेवणार आहेत. 
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेतील महिलांची छेडछाड, चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अशा घटनांचे फोटो किंवा माहिती फेसबुकवरील वेबपेजवर अपलोड करता येतील. विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य व पश्‍चिम रेल्वेवर "निर्भया पथके‘ तैनात करण्यात आली आहेत. यातील महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, भविष्यात त्यांना तायक्वॉंदोचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

त्याचप्रमाणे प्रवासी सुरक्षा समिती तयार करण्यात आली आहे. या समितीची दरमहिन्याला बैठक होईल व त्यात महिलांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला जाईल. त्याचप्रमाणे रेल्वे फलाटावर महिलांच्या मदतीसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत व एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदतही घेतली जाणार आहे. याशिवाय फलाटांवर तक्रार पेट्या लावण्याचा विचार असल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले. 

रेल्वेच्या हद्दीत असलेले सीसी टीव्ही कॅमेरे अत्याधुनिक नाहीत. गेल्या वर्षी मे महिन्यात वांद्रे टर्मिनस येथे प्रीती राठी या तरुणीवर ऍसिड हल्ला झाला होता. तेव्हाच सीसी टीव्हीच्या गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. आता चांगल्या दर्जाचे सीसी टीव्ही कॅमेरे असावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. सिंगल म्हणाले.

Post Bottom Ad