'इबोला' रोखण्यासाठी राज्य सरकारची शोधमोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2014

'इबोला' रोखण्यासाठी राज्य सरकारची शोधमोहीम

मुंबई : पश्‍चिम आफ्रिकेतील चार देशांमध्ये 'इबोला' या विषाणूजन्य रोगाची लागण झाली असून या देशांत असलेल्या भारतीयांची संख्यादेखील लक्षणीय आहे. या रोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने पावले उचलली असून शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इबोला विषाणूने ग्रासलेला एखादा रुग्ण आढळल्यास त्याची ने-आण करण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय सेवेअंतर्गत असलेल्या रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. 

मुंबईत छत्रपती शिवाजी विमानतळावरही महाराष्ट्र राज्य अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाच्या दोन रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. यासंबंधी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या संचालनालयाच्या केंद्राच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाने विमानतळ वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार ही उपाययोजना करण्यात आल्याचे राज्य आरोग्य विभागाने सांगितले. आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाने विमानतळ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने यासंबंधी माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले होते. विमानतळावर इबोला डिसीज व्हायरस (ईव्हीडी)ची लागण झालेला संशयित रुग्ण आढळल्यास त्यांचा निवासाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक यासंबंधीची सविस्तर माहिती गोळा करून अशा रुग्णांची यादी गोळा करण्यास सांगण्यात आले होते. यासाठी पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये दहा खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ईव्हीडीच्या पार्श्‍वभूमीवर कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांशी राज्य सरकारने चर्चा केली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला ईव्हीडीला तोंड देण्यासाठी रोगनिदान सुविधा पुरवण्यास कळवण्यात आले आहे.

इबोला विषाणूची लागण झालेल्या परिसरात प्रवासी तसेच व्यावसायिकांनी दिलेल्या भेटीत त्यांना ईव्हीडीची लागण होऊन ते परत आल्यानंतर तो आजार बळावण्याची धोका फारच कमी आहे. ईव्हीडीचा फैलाव प्रथम ज्या ठिकाणी झाला अशा ठिकाणी भेट दिल्यानंतरही या आजाराची शक्यता कमी असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
     

Post Bottom Ad