मुंबई : ‘धनगड’ आणि ‘धनगर’ ही एकच जात असून, धनगरांचा समावेश आदिवासीप्रमाणोच अनुसूचित जातीत करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी धनगर समाज आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन दिले. मात्र या निवेदनासोबत राज्यातील सुमारे 11 लाख समाज बांधवांनी सह्या केलेली 35 पोतीही मुख्यमंत्र्यांना धाडण्यात आली.
आज आझाद मैदानात कृती समितीचे शेकडो प्रतिनिधी निवेदनांची पोती घेऊन उपस्थित होते. बैलगाडी घेऊन निवेदनाची पोती घेऊन जाण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती कृती समितीचे मार्गदर्शक रमेश शेंडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील 35 जिल्ह्यांमधील 11 लाख समाज बांधवांनी सह्या केलेली निवेदने या पोत्यांत आहेत. एकूण 35 जिल्ह्यांतून 35 पोती जमा करण्यात आली आहेत. पोलिसांनी बैलगाडी आणण्यास परवानगी नाकारल्याने निवेदनांनी भरलेली पोती कार्यकत्र्याच्या मदतीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येत आहेत.’ निवेदन देण्यासाठी आझाद मैदानात शेंडगे यांच्याशिवाय दुग्धविकास मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार हरिदास भदे यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
दरम्यान, 11 लाख सह्यांच्या निवेदनावरून मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या भावना समजून घेण्याचे आवाहन कृती समितीचे समन्वयक लहू शेवाळे यांनी केले. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू केले नाही, तर परिणाम भोगावे लागतील, असा सूचक इशाराही त्यांनी या वेळी दिला.